मुंबई : जून महिना संपत आला तरी हवा तसा पाऊस झालेला नाही. महाराष्ट्राचं चेरापुंजी समजलं जाणारं कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडे गावही अजून तहानलेलंच आहे. या गावात राज्यातला सर्वाधिक पाऊस पडतो. जून महिना जवळपास उलटून गेला आहे. तरीही आभाळाला काही दया आलेली नाही. एरव्ही जून महिन्यात या गावात इतका पाऊस पडतो की 100 मीटरवरचं काहीही दिसत नाही.


पावसाळ्याचे तीन महिने गावात कर्फ्यू लागल्यासारखी अवस्था असते. पण यावर्षी ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडल्याचं चित्र आहे. जी अवस्था मराठवाडा, विदर्भात आहे तीच सध्या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या किटवड्यातही आहे. या गावात भात मुख्य पीक आहे. मे महिन्याच्या 20 तारखेला ते भाताची रोपं तयार करतात. पुढील 35 दिवसात रोपं लावणं गरजेचं असतं. पण आता 40-45 दिवसानंतरही इथे पावसाचा थेंबही पडलेला दिसत नाही.

रामा कांबळेंची हयात किटवडेचे पावसाळे अनुभवण्यात गेली. पण 65 वर्षांमध्ये जून कोरडा गेल्याचा चमत्कार त्यांनी पहिल्यांदा पाहिला आहे. किटवड्यात चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस पडतो. इथे पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याचा अनुभव आहे. पण पाऊस नसल्याने पहिल्यांदाच हे दिवस गावकऱ्यांना बघावे लागत आहेत.

किटवड्यात स्लॅबचं घर बांधायचं तरी भीती आहे. कारण इथे इतका पाऊस पडतो की 3-4 वर्षात स्लॅबला गळती लागते. त्यामुळे विटा आणि मातीचं घर शक्य नाही. इथे चिराच कामाला येतो. शिवाय घर बांधल्यावर वर छत निर्माण करावं लागतं.  कोल्हापूर जिल्हा सधन मानला जातो. ऊसाची शेती. दुसरीकडे कोकणाच्या बाजूला आंबा, काजू, फणस पिकतो. इकडचा भातही प्रसिद्ध आहे. पण किटवड्याला चेरापुंजी म्हणण्याचं विशेष कारण आहे.

1984 साली किटवड्यात चार महिन्यात 9 हजार मिलीमीटर पाऊस पडला.

1994 साली हा पाऊस जवळपास 8 हजार 997 मिलीमीटर इतका झाला.

हा पाऊस राज्याच्या एकूण सरासरीच्या दुप्पट होता.

2017 साली किटवड्यात 7 हजार 623 मिलीमीटर पाऊस पडला

गेल्या वर्षीही राज्याला पावसाने हुलकावणी दिली असली तरी किटवड्यावर वरुणराजाची कृपा कायम होती.

एरव्ही दुष्काळ नाही, पाऊस नाही म्हटलं की विदर्भ मराठवाडा किंवा मग माण, खटाव आटपाडीची चर्चा होते. पण दुष्काळाची चाहूल म्हणजे काय किंवा सरासरीएवढाही पाऊस पडण्याची शक्यता नाही, याचा नमुना म्हणजे किटवडे आहे. वायू वादळानं मान्सून लांबवला. तो रांगत रांगत महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पण तांत्रिकदृष्ट्याच.



गेल्यावर्षीपासूनच सधन कोल्हापूरकडे पावसानं पाठ फिरवली आहे. कारण 2018 साली सरासरीच्या केवळ 87 टक्के पाऊस झाला आहे. यावर्षीही सगळी हवामान मॉडेल्स 15 जूनपर्यंत पाऊस जोर धरणार नाही, असं म्हणत आहेत. अर्धा देश दुष्काळात आहे. पिण्याच्या पाण्याचे वांदे झालेत. जर किटवड्याची ही दशा असेल तर देशाचं पुढचं वर्ष कसं जाणार मोठा प्रश्न आहे.