सांगली : नुकत्याच पार पडलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली होती. उमेदवार आणि चिन्हांच्या यादीत फेरफार करुन निकाल फिक्स असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक निकालापूर्वीच मिरजेतील प्रभाग चारमधील उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी फिक्स झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. महापालिका निवडणुकीत लागलेल्या धक्कादायक निकालामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला. त्यातच मिरजेत प्रभाग चारमधील भाजप उमेदवारांच्या मतदानाच्या आकडेवारीचे अगोदरच सेटिंग झाल्याची अफवा वायरल झाली.
प्रभाग चारसह अन्य प्रभागातील पराभूत उमेदवारांनीही न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला होता. प्रभाग चारमधील उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीनंतर त्यांना मिळालेल्या चिन्हांसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरुन काढून नेऊन अज्ञाताने निवडणूक निकाल लागल्यानंतर त्यावर चारही गटातील मतांची आकडेवारी खोडसाळपणे लिहिली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली.
यादीमुळे पराभूत उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदानात घोटाळा झाल्याचा दावा करत होते. निकाल 18 जुलै रोजीच तयार झाल्याचा आणि प्रभाग चारमध्ये मतदानाची आणि मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं गेल्याने संभ्रम निर्माण झाला होता.
प्रभाग चारमधील विजयी झालेल्या भाजप उमेदवाराच्या निवडीविरुद्ध मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप घेऊन अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी आणि शुभांगी रुईकर यांनी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियावरील मतदानाची आकडेवारी बोगस असल्याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर निवडणूक निकाल आणि इव्हीएम यंत्राबाबत अपप्रचार केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली मनपा निकाल फिक्सिंगच्या अफवा, गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Aug 2018 09:10 AM (IST)
उमेदवार आणि चिन्हांच्या यादीत फेरफार करुन निकाल फिक्स असल्याची अफवा पसरवणाऱ्या अज्ञाताविरोधात शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -