सांगली : भाजपची सत्ता असलेल्या सांगली महापालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपत आहे. आता 23 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड प्रकिया पार पडणार असून काँग्रेस -राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची आताची महापौर -उपमहापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे.


राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या निवडीत लक्ष घालत महापालिका मधील सत्ता काबीज करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. दरम्यान महापौर-उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू आहे.


भाजपकडून मात्र सर्व 43 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी कडून भाजपची सत्ता काढून महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे मनसुबे सुरू आहेत. भाजपच्या आताच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी आहे. तसेच भाजपच्या काही नगरसेवकात नाराजी आहे. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळून आम्ही उठवू आणि भाजपची सत्ता उलटवून टाकू, असं काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत.