सांगली/कोल्हापूर: सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पाऊस कमी आल्याने सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत देखील कमी झाल्याचं दिसत आहे. चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे.

काल पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे. कोयना धरणात 63 टीएमसी इतका पाणी साठा आहे. धरण परिचलन सूचीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीवर गेल्यीनंतरच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी झाली आहे अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून कळवण्यात आली आहे.

मात्र चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून 4400 क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठावरील गावे व नागरिकांना सकर्त राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पातळीत होणार वाढ

महापूराच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने यंदा जय्यत तयारी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. त्यातील एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा ( ता. वाळवा) येथे तैनात ठेवलेली आहे.

पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली
कोल्हापुरात देखील पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या 12 तासात पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली आहे. सध्याची पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी आहे. राधानगरी धरणाचे रात्री आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. दरम्यान काल कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 4413 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 1100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली होती. तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी NDRF च्या आणखी दोन टीम पुण्याहून रवाना झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात NDRF च्या एकूण 6 टीम कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध भागात NDRF ची पथकं आज रवाना होणार आहेत.