नाशिक : शहीद झालेल्या जवानाला किंवा देशातील विशिष्ट पदावर असलेल्या व्यक्तीला तिरंग्यात गुंडाळून निरोप देण्याची परंपरा आजपर्यंत पाहण्यात आलेली आहे. मात्र देशाचा राष्ट्रीय पक्षीय असलेल्या मोराला सुध्दा तिरंग्यात गुंडाळून त्याचा शासकीय इतमामात अंत्यस्कार झाल्याचा दुर्मिळ प्रकार नाशिक जिल्हयात घडला आहे.


नाशिक जिल्हयातील वडनेर-भैरव-पिंपळगाव बसवंत हद्दीतील शासकीय रोप वाटिकेतील एका इलेक्ट्रीक खांबावरील विद्युत तारांचा शॉक लागून एक मोर जखमी अवस्थेत आढळला. पक्षी प्रेमींच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर मोराला  पशुवैद्यकिय दवाखान्यात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मोराला मृत घोषित केल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार राष्ट्रीय पक्षीय असलेल्या मोराचा अंत्यविधी करण्यापुर्वी वनविभागाने त्याला राष्ट्रध्वजात लपेटून त्याचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दुर्मिळ प्रकार प्रथमचं पहावयास मिळाला.



 मोर मृत अवस्थेत सापडल्यावर त्याचा पंचनामा करण्यात येऊन त्याला दफन करण्यात येते. मात्र आज एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्र ध्वजात गुंडाळून त्याला सुध्दा शासकीय मान वनविभागाच्या अधिका-यांनी दिल्याने ही बाब सध्या चर्चेचा विषय बनली आहे.