सांगली: राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे, पण धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागल्यापासून आमच्या घड्याळाची वेळ चुकत आहे अशी मिश्किल टिप्पणी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. सांगलीतील जिल्हा बँकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासमोर केली आहे. 


सांगली जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला राज्यमंत्री विश्वजित कदम यांना यायला थोडा उशीर झाल्याने हा कार्यक्रमही उशीरा सुरू झाला. नेमका हाच धागा पकडून जयंत पाटलांनी ही टिप्पणी केली. जयंत पाटील म्हणाले की, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची वाट बघत बसावं लागलं आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ लागला. राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे पण धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागल्यापासून आमच्या घड्याळाची वेळ चुकतेय पण मी हे मिश्किलपणे  बोललोय, कुठं  छापू नका. खरं तर सांगली जिल्ह्यात हात, धनुष्यबाण आणि घड्याळ म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था जनतेने विश्वासाने आपल्या सर्वांना चालवायला हातात दिलीय. 


सांगलीत स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या मिश्किल टिप्पणीबाबत ओळखले जातात. कोणत्या वेळी काय बोलायचं आणि कुणाला शालूतून जोडे हाणायचे हे त्यांना नेमकेपणाने ठाऊक आहे. अशा प्रकारच्या टिप्पणी आणि टोमणे हे त्यांच्या भाषणाची खासियत आहे. जयंत पाटीलांनी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदमांच्या समोरच ही मिश्लिक टिप्पणी केली आहे. 


आता जयंत पाटलांनी खरोखरच मिश्किल टिप्पणी केली का, की त्यातून त्यांना काही संदेश द्यायचा आहे, तसेच ही टिप्पणी केवळ सांगली जिल्हा बँकेतल्या आघाडीविषयी आहेत का महाविकास आघाडी सरकारबद्दल हे त्यांनाच माहिती.


महत्त्वाच्या बातम्या: