Raigad Latest News : शिवसेनेचे माजी रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेचे मित्राबरोबर असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी बबन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 


एका महिलेचे मित्रासोबतचे असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील आणि खारघरचे माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे बबन पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  पीडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवाशी आहे. ही महिला पतीपासून विभक्त कुटूंबात राहते, काही दिवसांपूर्वी या पीडित महिलेने मित्रासोबत काढलेले  सेल्फी फोटो, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी व्हॉटसअप ग्रुपवर व्हायरल केले होते. तसेच  खारघर शहराचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी देखील हेच फोटो सोशल मिडायावर व्हायरल केले होते. व्हायरल मेसेजमध्ये शिवेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांचे शहर प्रमुखांचा प्रताप असे लिहीत फोटो व्हायरल केले होते. 


मित्रासोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजल्यानंतर, या घटनेचा जाब विचारण्यासाठी पीडित महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी शंकर ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून घरात धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. मित्रासोबत जशे फोटो काढले आहेत, तसेच फोटो माझ्यासोबत काढ, असे म्हणत माझ्यासोबत अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न देखील केल्याचा  आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. तुझे फोटोचे बॅनर बनवून खारघर शहरात लावण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.  बबन पाटील यांनी देखील तुझे फोटो दोन दिवसात बॅनर करून शहरात लावतो, अशी धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे माझी बदनामी झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून ही राजकीय खेळी असल्याचे बबन पाटील यांनी सांगितले आहे. तर शिवसेना हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. सदरची घटना आपल्याला समजली असून झालेल्या गंभीर आरोपाप्रकरणी पक्षातील वरिष्ठ नेते चौकशी करून योग्य ती दखल घेतील, असे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी स्पष्ट केले आहे.