Union Budget 2022 Reactions: : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपने केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. हा अर्थसंकल्प देशाला बलशाली करणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे. 


राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


 






राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प नसून निवडणूक संकल्प असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.  


 






अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मोठ्या घोषणा केल्या आहेत. बजेटमध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर देण्यात आला आहे. तर  प्राप्तीकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.


किसान ड्रोन्सचा वापर शेतीमध्ये केला जाणार
किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे.


आरबीआयचं डिजिटल चलन येणार
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे.सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे.