Sangli Latest News:  विरोधकांवर आक्रमक टीका करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्याला निमित्त ठरलंय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची (sangli jilha bank) नवीन वर्षाची डायरी. जिल्हा बँकेच्या या डायरीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाला नो एन्ट्री असल्याचे समोर आलं आहे. पडळकर यांचे या डायरीत नावच नाही. मात्र बाकी विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे आहेत. मात्र पडळकर यांचेच नाव नसल्याने जिल्हा बँकेच्या डायरीत पडळकर यांना का एन्ट्री नाही याची चर्चा रंगली आहे.


सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Sangli District Bank) 2022 या वर्षाची नवीन डायरी गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रकाशित केली. डायरीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार,बँकेचे संचालक यांची क्रमाने नावे आहेत. 


जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांची देखील यात नावे आहेत. मात्र विधान परिषद सदस्य असलेल्या पडळकर यांचे मात्र या डायरीत नाव नाही. विधान परिषद सदस्यांच्या यादीतून भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकरांचे नाव वगळल्याचे  समोर आलं आहे. या डायऱ्यांचे सर्व संचालकांना वाटप केले. संचालकांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नवीन डायरी दिल्या.




खासदार आणि आमदारांची नावे असताना आमदार पडळकरांचे नाव नसल्याचे दिसून आले.  जिल्हा बँकेच्या वतीने दरवर्षी नवीन डायरी काढली जाते. या डायरीमध्ये  जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदारांची नावे प्रसिद्ध केली आहेत. परंतु विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये आमदार मोहनशेठ कदम, आमदार अरुण लाड, आमदार सदाशिव खोत यांची नावे आहेत. भाजप आ. गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळले आहे. यावरून आ. पडळकर यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील आणि आ. पडळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पालकमंत्री आणि आमदार यांच्यातील वादामुळे नाव वगळल्याची चर्चाही रंगली आहे.




पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना माझी अॅलर्जी


जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डायरीत आपले नाव वगळले असल्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्या नावाची अॅलर्जी असल्याची टीका आमदार पडळकर यांनी या प्रकारावर बोलताना केली आहे.