सांगली : पाचशे ते आठ हजार रुपयांची गुंतवणूक करा आणि लाखो रुपयांची बक्षिसं जिंका, असं आमिष दाखवून सांगलीत शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. श्री साई एन्टरप्राईझेस नावाच्या कंपनीने तासगाववासियांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.


श्री साई एन्टरप्राईझेस या कंपनीच्या ऑफरमध्ये तासगाव आणि परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला लोकांना हजारो रुपयांच्या वस्तू काहीशे रुपयांमध्ये मिळाल्या. पण सोमवारी शेवटचा ड्रॉ असतानाच या कंपनीच्या चालकांनी मुद्देमालासह पोबारा केला.

गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते गोळा करण्याचे काम सर्रासपणे सुरु होते. कंपनीच्या नियमानुसार आठही सोडतीत मोठं बक्षिस लागलं नाही, तरीही बक्षिस न लागलेल्या ग्राहकांना फ्रीजचं हमखास वाटप होणार होतं. त्यामुळे अनेक ग्राहक सहज भुलले.

प्रत्येक ग्राहकाकडून सुमारे आठ हजार रुपये कंपनीकडे भरण्यात आले होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी पोबारा केल्याने ग्राहकांना आपली फसवणूक झाली. अनेक जणांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून नेमकी किती रुपयांची फसवणूक झाली, हे स्पष्ट झालेलं नाही.