नागपूर : नागपूर महामेट्रो प्रकल्पामध्ये केवळ स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात, या प्रकल्पात परप्रांतीयांना नोकऱ्या दिल्या जाऊ नयेत, या मागणीसाठी विदर्भवासियांनी आज नागपुरात आंदोलन छेडलं. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या बेरोजगार तरुणांना घेऊन महामेट्रो रेल्वे कार्यालयासमोर हे आंदोलन केलं.


ज्यावेळी विदर्भातील तरुण मेट्रोच्या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज घेऊन जातात, तेव्हा तुम्हाला अनुभव नाही, असं सांगून त्यांना नोकरी नाकारली जाते. मात्र, परप्रांतातून आलेल्या आणि अनुभव नसलेल्या तरुणांना कंत्राटदारांच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या जातात, असा आरोप आजच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी केला.

नागपुरात तब्बल दहा हजार कोटींचा महामेट्रो प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीचं काम सध्या वेगात सुरु आहे. मात्र, स्थानिक भूमीपुत्रांना डावलून कंत्राटदार परप्रांतातून आणलेल्या तरुणांना मेट्रोच्या कामात नोकऱ्या देत असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.


दरम्यान, नागपुरात जमीन किंवा घरांचं रजिस्ट्रेशन करताना मेट्रोच्या नावाने एक टक्का जास्त कर नागरिकांकडून आकारला जात आहे. मग नोकऱ्या देताना नागपूरकर किंवा विदर्भातील तरुणांशी दुजाभाव का केला जात आहे? असा सवाल ही विदर्भ राज्य आंदोलन समितीने उपस्थित केला आहे.


नागपूर महामेट्रोने नोकऱ्यांसंदर्भातील धोरणात बदल केले नाही, तर मेट्रोमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना हुसकावून लावू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.