मुंबई : स्टॅम्प पेपर घोटाळा (Stamp Paper Scam), यालाच तेलगी स्कॅम (Telgi Scam 2003) म्हणूनही ओळखलं जातं. स्टॅम्प पेपर घोटाळा हा एक आर्थिक घोटाळा आहे, जो 1992 मध्ये सुरू झाला आणि 2003 मध्ये उघडकीस आला. या घोटाळ्यात एक अत्याधुनिक बनावट स्टॅम्प पेपर रॅकेटचा समावेश होता, जो भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरला होता आणि त्याची किंमत 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. या घोटाळ्यामागील सूत्रधार अब्दुल करीम तेलगीला दोषी ठरवण्यात आलं.


कोण होताअब्दुल करीम तेलगी ?


अब्दुल करीम तेलगीचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे 29 जुलै 1961 रोजी झाला. त्याचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते आणि तेलगी लहान असतानाच त्याच्या वडीलांचं निधन झालं. तेलगीने ट्रेनमध्ये फळे आणि भाजीपाला विकून स्वतःच्या शिक्षणाचा आधार घेतला आणि अखेरीस तो सौदी अरेबियाला गेला. सात वर्षांनी भारतात परतल्यावर त्याने बनावट कारकीर्दीची सुरुवात केली. अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स या त्याच्या कंपनीमार्फत भारतातून सौदी अरेबियात मजूर निर्यात करण्यासाठी त्याने बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रे तयार केली. त्यानंतर पुढे तो बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याकडे वळला.


काय आहे स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरण?


1992 पासून तेलगीच्या घोटाळ्याचे दोन पैलू होते. एक म्हणजे बनावट मुद्रांकाची कागदपत्रे तयार करणे आणि दुसरं म्हणजे स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण करणे, ज्यामुळे तेलगीला बनावट पुरवठा करण्याची योग्य संधी निर्माण होईल. तपासानुसार, तेलगीच्या टीमने महाराष्ट्रातील इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या अधिकाऱ्यांना कागदपत्रांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी यंत्रसामग्री आणि छपाई साहित्य मिळवण्यासाठी लाच दिली. बनावट कागदपत्रांमध्ये स्टॅम्प पेपर, न्यायालयीन कोर्ट फी स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प, स्पेशल अॅडहेसिव्ह स्टॅम्प, विदेशी बिले, ब्रोकरच्या नोट्स, विमा पॉलिसी, शेअर ट्रान्सफर सर्टिफिकेट, विमा एजन्सी आणि इतर अनेक कायदेशीर कागदपत्रांचा समावेश होता. या संपूर्ण घोटाळ्याची किंमत 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.


स्टॅम्प पेपर घोटाळा कसा उघड झाला?



  • 19 ऑगस्ट 2000 रोजी, कॉटनपेट, बेंगळुरू येथे बनावट स्टॅम्प पेपरची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी घोटाळ्याचा पर्दाफाश केला. यामुळे बंगळुरूमध्ये छापे टाकण्यात आले, यामध्ये बनावट स्टॅम्प पेपर आणि 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची इतर कायदेशीर कागदपत्रे उघडकीस आली. मात्र, यावेळी अब्दुल करीम तेलगी हा केवळ फरार झालेल्या संशयितांपैकी एक होता. 

  • 1992 ते 2002 या कालावधीत या मुद्रांकांशी संबंधित किमान 12 प्रकरणे तेलगीविरुद्ध एकट्या महाराष्ट्रात नोंदवण्यात आली होती आणि इतर राज्यांतून अतिरिक्त 15 खटले दाखल झाले. 1991 मध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेलगीवर कोणतीही गंभीर कारवाई झाली नाही.

  • सूत्रांच्या माहितीनुसार, 1996-97 या आर्थिक वर्षासाठी कर विभागाच्या मूल्यांकनानुसार तेलगीचे वार्षिक उत्पन्न 4.54 कोटी रुपये होते, ज्यापैकी जवळपास निम्मे उत्पन्न (2.29 कोटी रुपये) "बेहिशेबी" ठरवण्यात आले. नंतर, तेलगीच्या कायदेशीर पथकाने या संपत्तीचे श्रेय रॉकेल वाहतूक व्यवसायाला देण्याचा प्रयत्न केला. पण, समर्थन दस्तऐवजांच्या अभावामुळे त्यांचा हा दावा रद्द करण्यात आला.

  • तेलगीला अखेर नोव्हेंबर 2001 मध्ये अटक करण्यात आली. तो राजस्थानमधील अजमेर यात्रेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेलगीच्या अटकेमुळे घोटाळ्याचे खरे प्रमाण हळूहळू उघड झालं. त्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की, तो एका घोटाळ्याचा एक छोटासा भाग होता, ज्यामध्ये पोलीस आणि राजकारण्यांसह अनेक उच्चपदस्थ अधिकारी सामील होते. ही माहिती मिळाल्यानंतर, विशेष तपास पथकाने (SIT) IPS अधिकारी श्री कुमार यांच्या नेतृत्वाखाली या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समर्पित टीम म्हणून "STAMPIT" ची स्थापना केली.

  • 27 ऑक्टोबर 2017 रोजी अब्दुल तेलगीचं दिर्घकाळ आजारामुळे निधन झालं. तो मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांनी ग्रस्त होता.