सांगली: म्हैसाळमध्ये झालेल्या नऊ जणांचे हत्याकांड हे अंधश्रेद्धेतूनच झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे.  मांत्रिकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 


गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मृतांकडून मोठी रक्कम घेतली होती. या पैशाच्या तगाद्यातून दोघा संशयितांनी 9 जणांना विष पाजून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनंतर तिथे सापडलेल्या चिठ्ठीवरून 25 जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असतानाच गुप्तधन मिळवून देतो म्हणून आब्बास महंमद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोघांनी वेळोवेळी व्हनमोरे कुटुंबाकडून मोठ्या रकमा दिल्याचे समोर आले. 


गुप्तधन मिळत नसल्याने व्हनमोरे कुटुंबीयांनी वारंवार दोघांकडे पैशासाठी तगादा लावला होता. गुप्तधन मिळेल म्हणून 20 जून रोजी रात्री संशयितांनी व्हनमोरे यांच्या म्हैसाळ येथील घरामध्ये एक पूजा ठेवली. या पूजेवेळी त्यांनी सर्वाना वेगवगळी विष दिले आणि त्यानंतर ते दोघेही निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील 9 जणांचा विष पिल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना प्रथम आत्महत्या असल्याचा संशय होता. मात्र यानंतर तपासाची चक्रे फिरवल्यावर या आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले. या प्रकरणी सोलापुरातील मंत्रिकासह एकास अटक केल्यानंतर गुप्तधन देण्यासाठीच या दोघांनी मयताकडून वेळोवेळी पैसे घेतले असल्याचे स्पष्ट झाले. घटनेदिवशी सोलापुरातील मांत्रिकाने पूजाविधी करून त्यांना विष प्यायला दिले होते. यावर अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संशयित अब्बास भगवान याच्या घरी नारळ, कवड्याची माळ असे साहित्य सापडले आहे, तर व्हनमोरे यांच्या घरी घटनास्थळी सुद्धा नारळ सापडले आहेत. घटना घडली त्या दिवशी  मांत्रिक त्याचा साथीदार धीरज सुरवसे याच्यासोबत व्हनमोरे याच्या घरी होता. त्याने सोबत जेवण केलं. त्यानंतर विधी करण्यासाठी अकराशे गहू प्रत्येकाला गच्चीत जाऊन मोजण्यास सांगितले. दरम्यान 9 बाटल्यांमध्ये विष ठेऊन प्रत्येकाला बोलवून बाटलीतील द्रव पिण्यास सांगितले. शेजारच्या खोलीत जाऊन शांत झोपण्यास सांगितले. 


व्हनमोरेंकडूनच लिहून घेतल्या होत्या चिठ्या
ईदच्या अगोदर डॉ. माणीक व्हनमोरे यांचे घरी येऊन यातील मयतांना त्रास देणाऱ्या लोंकांची नावे देवाचे गादीवर ठेवायची आहेत असे सांगून त्यांच्याकडून सुसाईड नोटस लिहून घेतली आणि ती स्वत:कडे घेवून सोलापूर येथे घेवून गेले. आता ही चिठ्ठी नेमकी कुणी लिहली हा तिढा पोलीस तपासातून सुटलाय.


चार वर्षांपासून उकळले होते पैसे
मांत्रिकाने गुप्तधन शोधून देतो म्हणून गेल्या चार वर्षांपासून वेळोवेळी पैसे घेतले आहेत. हे पैसे व्हनमोरे कुटुंबाने विविध सावकारांकडून तसेच इतर ठिकाणी हातउसने घेऊन मांत्रिकाला पैसे दिले असल्याचे समोर आले आहे. ते पैसे द्यायला लागू नयेत, म्हणून हत्याकांडाचा कट आखला गेला.