रायगड : पावसाळ्याचा हंगाम सुरू होताच अनेक पर्यटक हे कोकणातील धरणे, धबधबे परिसरात पर्यटनासाठी जातात. मुंबईनजीक असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर येथील धरण आणि धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारे अपघात पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांत पावसाळ्यात धरणाच्या जोरदार प्रवाहामुळे अनेकांचे बळी गेले होते.
मुंबईनजीक असलेल्या रायगड जिल्ह्यातील धरणे आणि धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. त्यातच, अवघ्या तासाभराच्या अंतरावर असलेले कर्जत आणि खालापूर परिसरतील झेनिथचा धबधबा, कर्जतजवळील आषाणे - कोषाणे , सोलनपाडा आणि पाली -भूतीवली धरण हे पर्यटकांच्या आकर्षणाचे धरण आहेत. यामुळे, या परिसरात मुंबई, ठाणे, पुणे परिसरातील बहुतांश पर्यटक हे एक दिवसीय सहलीसाठी मोठया प्रमाणात हजेरी लावत असतात.
त्यातच, कर्जत परिसरात सुमारे 18 पर्यटन स्थळ असून खालापूर हद्दीत 14 पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटक हजेरी लावत असतात. दरम्यान, या सर्व धबधबे , धरणे आणि तलावांच्या ठिकाणी पर्यटक येत असून काही ठिकाणी पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच या परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये, या परिसरालगतच्या एक किलोमीटर क्षेत्रात कलम 144(1) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. यामध्ये, 10 जून ते 9 ऑगस्ट या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
खालापूर येथील धामणी कातकरवाडी तलाव, आडोशी धबधबा, मोरबे धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, झेनिथ धबधबा, कलोते धरण या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तर, कर्जत येथील खांडस धरण, आषाणे- कोषाणे धबधबा, साळोख धरण, पाली - भूतीवली धरण, जुमापट्टी धबधबा, पळसदरी धरण हे प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
यामध्ये, पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे, मध्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे आणि वाहतूक, अनधिकृत मद्यविक्री करणे व उघड्यावर मद्यसेवन करणे यावर बंदी घालण्यात आले आहे. तर, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे अशा ठिकाणी सेल्फी काढण्यास, खोल पाण्यात पोहणे आणि उतरणे यावर बंदी करण्यात आली आहे.
तसेच, सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभय वर्तन आणि छेडछाड करणे, मोठ्या आवाजात स्पिकर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.