Nashik Leopard News : नाशिककर आणि बिबट्या हे समीकरण जणू नित्याचे झाले आहे. दर आठवड्याला शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे. अशातच वेळोवेळी नागरिकांना आवाहन देऊनही मानव बिबट्या हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो आहे. त्यामुळे बिबट्याच्या संदर्भात नागरिक कधी सजग होतील? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे. 


नाशिक शहर हे यंत्रभूमी तंत्रभूमी म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडच्या वर्षात नाशिक शहरात बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नाशिकची ओळख आता लेपर्ड सिटी म्हणून ओळख होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात वारंवार बिबट्याचं नाशिककरांना दर्शन होतं आहे. कधी बिबट्याचं दर्शन... तर कधी बिबट्याचा हल्ला... त्यामुळं बिबट्याने एकप्रकारे नाशिक हे माहेरघर झाल्याचे या घटनांवरून लक्षात येते. 


दरम्यान नाशिकचा पश्चिम पट्ट्यात मळे परिसर आणि बिबट्याचा अधिवास असण्यासाठी उपलब्ध पाणी, उसाची शेती यामुळे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या मले परिसरात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. शिवाय बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेतो. गावाजवळ अस्वच्छता असल्यास गावाजवळ वावरणारी डुकरे, कुत्रे यांच्या रूपाने सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांजवळ वावर वाढला आहे. याचमुळे नाशिक शहरातील अनेक भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे तर भक्षाचा पाठलाग करत तो मानवी वस्तीत अथवा घरात शिरल्याचीही उदाहरणे आहेत. 


आजच नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगरमध्ये बिबट्यानं डरकाळी फोडली. अशोकनगरमध्ये शिवतीर्थ बंगल्याच्या खालच्या बाल्कनीत बिबट्या दिसला...मुलीला शाळेत घेऊन जाणाऱ्या एका महिलेला बिबट्याचा हा सगळा थरार नजरेस पडला.वनविभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले...बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास 4 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र या सारख्या रेस्क्यूच्या घटना नाशिक शहरात यापूर्वी देखील निदर्शनास आल्या आहेत. या घटनाही अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. मात्र नागरिकांमध्ये अद्यापही बिबट्याबाबत हवी तशी जनजागृती दिसत नसल्याचे या घटनांवरून लक्षात येते. 


बिबट्या व मानव सहजीवन समजून घेणं महत्वाचं...! 
बिबट्याचा हा थरार नाशिककरांना नवीन नाहीत. असे अनेक बिबटे नाशिककरांनी पाहिले आहेत.. कधी त्यांना शहरापासून परतून लावलंय तर कधी बिबट्यानं नागरिकांवर हल्ले केलेत. त्यामुळं बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्यासाठी ठोस निर्णय होणं गरजेचं आहे. त्यासाठी वनविभागाचा आणि नागरिकांचा पुढाकार महत्वाचा आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग, बिबट्या व मानव सहजीवन समजून घेऊनच शहरात राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, बिबट्यांची संख्या व त्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.


नागरिकांचा पुढाकार महत्वाचा 
दरम्यान नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांकडून त्यांच्या शेजार पाजारच्यांना सांगितले जाते. अनेकजण फोटो, विडिओ फोटो काढून इतरांना सांगतात. त्यामुळे बिबट्याच्या असलेल्या परिसरात नागरिक गर्दी करतात. शिवाय वनविभागाला बिबट्या रेस्क्यू करण्यात अडचणी येतात. त्यामुळे बिबट्या चवताळून नागरिक, कर्मचाऱ्यांवर हल्ला करतो.त्यामुले अशा परिस्थितीत नागरिकांनी सामंजस्याची भुमीका घेऊन वनविभागाला सहकार्य करणे आवश्यक असत.