Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रस्तावित राईट ऑफच्या मुद्यावरुन आणि बड्या नेत्याच्या व्याजमाफीच्या विषयावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकासोबत चर्चा केल्यानंतर आता सर्व मागण्या पूर्ण झाल्याची घोषणा स्वाभिमानीतर्फे करण्यात आली आहे.


सर्वात आधी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या गेटवर चढून गेट उघडण्यासाठी बोंबाबोब आंदोलन सुरू केले. यावेळी गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला होता. नंतर  गेटवरून उड्या मारून स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेच्या प्रवेशद्वारातून आत घुसले. यावेळी बँकेच्या गेटवरून उड्या मारलेल्या आंदोलकाची आणि पोलिसांची धक्काबुक्की देखील झाली. यानंतर बँकेचे संचालक काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भेट घेत मध्यस्थी करण्याचा केला प्रयत्न केला. आंदोलनाऐवजी चर्चा करण्याचा संचालकांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सल्ला दिला अणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेकडून चर्चेचे निमंत्रण स्वीकारले.


त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि काही संचालकासोबत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची बैठक केली. या बैठकीत स्वाभिमानीने आपल्या मागण्या अध्यक्ष आणि संचालक मंडळापुढे ठेवल्या. जर नेत्यांच्या कर्जावर राईट ऑफचा निर्णय घेतला जात असेल तर शेतकऱ्याच्या कर्जावर देखील राईट ऑफ चा निर्णय घेतला जावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. आधी बँकेने नेत्याच्या कर्जावरचा राईट ऑफचा निर्णय स्थगित केला. मात्र बड्या नेत्याच्या कारखान्याच्या कर्जाला, व्याजाला अभय देण्याचा निर्णय मात्र बँकेकडून प्रस्तावित होता. याला मात्र स्वाभिमानीचा विरोध कायम होता. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे बँकेकडून राईट ऑफ चा निर्णय स्थगित करण्याबरोबरच बड्या नेत्याच्या कारखान्याच्या कर्जाला, व्याजाला अभय न देण्याचा बँकेने निर्णय घेतला. दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी 2018 पर्यत लागू असलेली ओटीएस योजनेला 2023 पर्यत मुदतवाढ देण्यास बँकेला भाग पाडले. नियमित कर्जदाराची 12 टक्के व्याजामध्ये होणारी आकारणी 10 टक्क्यांवर करण्याचा ही निर्णय घेण्यास बँकेला भाग पाडले. तसेच 31 मार्च नंतर पीक कर्जामध्ये सवलत देण्यास देखील बॅंकेने तयारी दर्शवली आहे. यामुळे स्वाभिमानीने जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधातील आंदोलन मागे घेतले.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha