सांगली : 'काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली तरी भाजप जिंकली यावरुन कळतं कुणाच्या मनात कोण आहे'... मराठा मोर्चा, धनगर आरक्षणामुळे महाराष्ट्र पेटला असताना मुख्यमंत्र्यांनी हे बोलण्याची हिंमत केली, त्याचं कारण सांगलीचा निकाल... जिथं जयंत पाटील, विश्वजीत कदम, सतेज पाटलांसारख्या नेत्यांनी एकत्र लढूनही भाजपनं एकहाती विजय मिळवला.


नुकतेच प्रदेशाध्यक्ष झालेल्या जयंत पाटलांसाठी आघाडीचा पराभव सर्वात मोठी नामुष्की आहे. खरंतर 1998 ला सांगली पालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून सांगलीवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं आहे. आर. आर. पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील, प्रतीक पाटील यासारख्या दिग्गजांनी सांगलीत भाजपचं कमळ फुलायला जागाच दिली नाही.

2014 पासून गणितं बदलली. आधी लोकसभा, मग विधानसभा, जिल्हा परिषदा आणि आता महापालिका असा भाजपच्या विजयाचा अश्वमेध सांगलीत दौडत असताना दिसतोय. सांगली जिल्ह्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची मोठी परंपरा आहे, मग हा दारुण पराभव का स्वीकारावा लागला, हा प्रश्न पडतो.
सांगली-मिरज-कुपवाड मनपा निकाल: विजयी उमेदवारांची यादी

शहरातल्या सगळ्यात मोठ्या समस्या होत्या, रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या, ज्या 15 वर्षाच्या सत्तेतही आघाडीनं सोडवल्या नाहीत

ड्रेनेज योजना पूर्ण करण्याच्या नावाखाली पालिकेनं अख्खी सांगली खोदून ठेवली, लोकांची गैरसोय झाल्यानं संताप होता

अँटी इन्कमबन्सी असूनही काँग्रेसनं त्याच त्या चेहऱ्यांना तिकीटं दिली, ज्यामुळे किशोर जाधव, इद्रिस नायकवडींसारखे माजी महापौर पराभूत झाले

खड्ड्यांमधून रस्ता शोधणाऱ्या सांगलीकरांना मुख्यमंत्र्यांनी 33 कोटीचे रस्ते दिले, मिरजेला 20 कोटीचे रस्ते बांधले

शहराच्या विकासासाठी भाजपनं सुधीर गाडगीळांना प्लॅन बनवायला सांगितलं, आणि तो सांगलीकरांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे सांगलीकरांनी कमळाला साथ दिली.

कायम सोयीचं राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळेही सांगलीकर वैतागले होते. कोण कुणासोबत आहे, हे कळायचं बंद झालं होतं.

आर. आर. आबा आणि पतंगराव कदम हयात असताना जयंत पाटलांनी कायम त्यांच्या विरोधाचं राजकारण केलं. कधी भाजपला सोबत घेऊन तर कधी अपक्षांना सोबत घेऊन आपलं वर्चस्व कायम राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे जयंत पाटलांची विश्वासार्हता किती? हासुद्धा प्रश्न होता.

शिवाय विश्वजीत कदम, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील यांच्यात एकवाक्यता नव्हती हे तितकंच खरं.

पश्चिम महाराष्ट्र मराठा समाजाचा गड आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापुरात आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगलीत प्रचारही करता आला नाही. त्यानंतरही भाजपनं मिळवलेलं भरघोस यश विरोधकांसाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे आणि जयंत पाटलांसाठी तर सगळ्यात मोठा धडा.
संबंधित बातमी:

सांगली निकाल : भाजपची मुसंडी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चित