अंबरनाथ : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करुन घरातील खांबाला बांधून जाळल्याची घटना अंबरनाथच्या उसाटणे गावात घडली होती. मात्र कोर्टाने जामीन फेटाळूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्याची मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केली आहे.


अंबरनाथमधील वसार गावातील दीपा वायले हिचा विवाह उसाटणे गावात राहणाऱ्या विश्वास पाटीलसोबत 2011 साली झाला होता. मात्र लग्नानंतर 2 वर्षांनी तिची सासू सीताबाई, दीर संजय आणि भावजई सुरेखा पाटील यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. या सगळ्यात दीपाचा पती विश्वासनेही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे 24 फेब्रुवारी 2017 रोजी दीपाला सासरच्यांनी घराच्या गच्चीत नेऊन खांबाला बांधून पेटवून दिलं आणि मृत्यूनंतर तिचा मृतदेह गच्चीवरून खाली फेकला. त्यानंतर दीपानं स्वत:ला पेटवून घेत उडी मारली आणि आत्महत्या केली, असा बनाव त्यांनी रचला.


दीपाच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह बघितला, त्यावेळी तिच्या गळ्यात वायर गुंडाळण्यात आल्याचं समोर आलं. तसंच तिचा मृतदेह खाली फेकल्यानंतर शेजारच्यांनी लगेच तो उचलला असता तो थंड होता. शिवाय घराच्या गच्चीवरील एका पिलरला काळे डाग आणि मासाचे तिकडे चिटकल्याचं आढळून आलं. या पिलरच्या शेजारीच दोऱ्यांचे जळालेले तुकडेही सापडले. त्यामुळे सासरच्यांनी तिला पिलरला बांधून पेटवून जाळलं आणि आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचं निष्पन्न झालं.


याप्रकरणी दीपाच्या माहेरच्यांनी तक्रार करुनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी 3 महिन्यांनी हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला.


गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपाचा पती, सासू, दीर आणि भावजई यांनी अटकपूर्व जामीन सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टाने फेटाळला. त्यानंतरही हे सगळे अजूनही मोकाट फिरत आहेत. यामागे हिललाईन पोलीस मॅनेज झाले असल्याचा आरोप दीपाचा भाऊ मंगेश वायले याने केला. हिललाईन पोलिसांवर विश्वास नसून या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्याची मागणीही त्याने केली आहे.


दीपाला सासरच्यांनी जाळून मारलं, त्यावेळी ती 6 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी वायले कुटुंबाची मागणी आहे.