मुंबई : मराठा आंदोलकांच्या आडमुठेपणामुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा दावा करणारी आमदार नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. विशेष म्हणजे हे संभाषण आपलंच असल्याची कबुली नितीश राणे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.


मराठा संघटनेच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यासोबत झालेल्या या संवादामध्ये नितेश राणे यांनी मराठा संघटनांमधल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक जाणूनबूजून टाळल्याचा आरोप केला आहे. मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना दगा दिला, इतकंच नाही तर काही समन्वयकांनी महामंडळांची मागणी केल्याच गौप्यस्फोटही या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.

ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर ती आपलीच असल्याची कबुलीही नितेश राणे यांनी दिली आहे. 'जी सत्य परिस्थिती होती, ती मी सांगत होतो. त्यात काहीच चुकीचं नाही' असंही नितेश म्हणाले.

परळीहून काही जण महामंडळं आणि इतर मागण्या घेऊन आले होते. पण आम्ही त्यांना विरोध केला. कारण मुख्य मागणी मराठा समाजाविषयी असेल, असा दावाही नितेश राणेंनी केला.

ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी एकत्र यायला हवं, असं आवाहनही यानंतर नितेश राणेंनी केलं.