मुंबई :  देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग म्हणून नावावर रुपास आलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) उद्घाटनापासून फक्त अपघातांसाठी चर्चेत आला. मात्र, आता समृद्धी महामार्गाची ही "खरी कमाई" सुरू झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या महामार्गाचा पहिल्या टप्प्याची वाहतूक सुरू झाली होती. आता हा महामार्ग नाशिकमधील भरवीरपर्यंत 600 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे आता यावरून वाहनांची वर्दळ ही वाढली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. गेल्या नऊ महिन्यात समृद्धी महामार्गाने जवळपास अडीचशे कोटी रुपये कमवण्याचा टप्पा पार केला आहे.


समृद्धी महामार्गावरून झालेली टोल वसुली महिनानिहाय :


डिसेंबर 2022 - 13,17,72,312 रुपये 
जानेवारी 2023 - 28,53,23,483 रुपये
फेब्रुवारी 2023 - 30,47,51, 967 रुपये
मार्च 2023 - 34, 23,03, 220 रुपये
एप्रिल 2023 - 33, 20, 28, 984 रुपये
मे  2023 - 36, 48, 40, 721 रुपये
जून 2023 - 39, 54, 01, 136 रुपये 
जुलै 2023 - 29, 12, 01, 38 रुपये


गेल्या नऊ महिन्यात समृद्धी महामार्गावरून जवळपास 50 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. यामुळे मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी आता "समृद्धी" कडून उत्पंनाचा स्त्रोत सुरू झाल्याचं चित्र आहे.


समृद्धी महामार्गावर मागील 10 महिन्यात दरमहा सरासरी 128 अपघात


समृद्धी महामार्गामुळे वाहन चालकांना सुस्साट प्रवास करता येत असला तरी अपघातांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मागील 10 महिन्यात समृद्धी महामार्गावर 1281 अपघात झाले आहेत. यामध्ये 932 अपघात हे किरकोळ स्वरुपाचे असल्याची नोंद करण्यात आली. तर, 417 मोठ्या अपघातांची नोंद करण्यात आली. मागील 10 महिन्यात झालेल्या अपघातात 123 जणांना प्राण गमवावे लागले. 


समृद्धी महामार्गावर अपघाताची कारणे वेगवेगळी आहेत. यामध्ये वाहनांची टायर चांगल्या स्थितीत नसल्याचे टायर फुटून अपघात झाल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, 'महामार्ग संमोहन' प्रकारामुळेही अपघात होत असल्याचे एका अभ्यासात समोर आले. 


मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत?


शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.


पुढल्या वर्षी, म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची चर्चा आहे.