जालना :  पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) आता गरिबांची गरज नाही हे कळलं आहे. आता आमची आरक्षणाची लढाई आम्हीच लढू असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटले. शिर्डी दौऱ्यावर (Shirdi Tour) आलेले पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा कोणताही उल्लेख न केल्याने मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये (Maratha Reservation) नाराजी पसरली आहे. उपोषणावर असलेल्या जरांगे यांनीदेखील पंतप्रधानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. 


मनोज जरांगे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान मोदी हे सरकारला सांगू शकत नसतील तर तेथून दिल्लीतून काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्न सोडवतील असा गैरसमज होता. पण मोदी बोलले नाही म्हणून बर झालं. त्यामुळे ते गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान आहेत हा गैरसमज दूर झाला असल्याचेही मनोज जरांगे यांनीी म्हटले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती. मात्र याविषयी नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावर भाष्य केले नाही. मराठा समाजाने ठरवले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येऊ दीले नसते. पंतप्रधान मोदी बोलले नाही हे बरे झाले. यावरून समजते की त्यांना आता गोरगरीबांची गरज नाही. त्यामुळे आम्ही आता ही लढाई आम्हीच लढणार असल्याचा एल्गार जरांगे यांनी केला. 


माझ्या नवऱ्याला काही झालं तर त्याला सरकारचं जबाबदार राहील', जरांगेंच्या पत्नीने दिला सरकारला इशारा


मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे आता त्यांच्या परिवाराची चिंता वाढलीये. 'आरक्षणाचा  मुद्दा तात्काळ निकाली काढावा अन्यथा आपल्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील' असा इशारा मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याने काहीतरी मार्ग निघेल अशी आशा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर एकतर आता माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.


मनोज जरांगे यांच्या तपासणी साठी आलेले डॉक्टरांचे पथक माघारी....


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एक डॉक्टरांचे पथक गावात दाखल झाले. यावेळी या पथकाच्या डॉक्टरांकडून मनोज जरांगे यांना तपासणी करण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे ही विनंती नाकारत आरक्षण हाच आपल्यावर उपचार असल्याचं म्हटले.  बुधवारी, संभाजीराजे छत्रपती यांच्या आग्रहास्तव जरांगे यांनी पाणी घेतलं होतं. मात्र आज सकाळपासून त्यांनी पाणी बंद केलंय.