मुंबई शिर्डी दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) उत्तर दिले आहे. जयंत पाटील यांनी शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करणारा पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. 


पंतप्रधान मोदी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर शरद पवार यांचे नाव न घेता  टीका केली. काही लोकांनी अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले. पण, त्यांच्यासाठी काहीच केले नसल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. त्यानंतर आता, जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ट्वीटरवर जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवार यांनी 60 वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार यांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती.


व्हिडीओत पंतप्रधान मोदी यांनी काय म्हटले?


एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणतात की, एकदा मी देखील क्रिकेट प्रशासनाच्या कामात आलो होतो. त्यावेळी शरद पवार देखील होते. त्यांच्यासोबत क्रिकेटवर 8-10 मिनिटे बोललो तर शरद पवार हे किमान 3-5 मिनिटे शेतीवर बोलायचेच. क्रिकेटचा विषय असला तरी पवार चर्चा शेतीवर न्यायचे. यावरून समजते की त्यांच्या डोक्यात सातत्याने शेती, शेतकरी, ग्रामीण विकास हे मुद्दे असायचे. शेतीमधील आधुनिकतेवर सातत्याने त्यांचा भर असायचा. तुम्ही शरद पवार यांच्यासमोर फक्त ऊस हा शब्द उच्चारा, ते तुम्हाला तासभर माहिती देतील. 







पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीत काय म्हटले?


'महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो, मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडे तेरा लाख कोटी रुपयाच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.