Samruddhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा हद्दीतील चॅनेल 332 येथे झालेला भीषण अपघाताने (Accident) महाराष्ट्र हादरला. या अपघातात एकूण 25 लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील प्रवासाच्या सुरक्षेतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशात आता समृद्धीवरून प्रवास करणारे प्रवासी देखील या अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेताना दिसून येत आहे. कारण या अपघातानंतर नियंत्रण कक्षात वाहनचालक आणि प्रवाशांकडून महामार्गावरील सुविधा, पेट्रोल पंप आणि विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाण कोणते असेल या विषयी माहिती विचारणारे फोन कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहेत. 


बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी एका खाजगी बसचं अपघात झाला, ज्यात बसला आग लागून 25 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता पुन्हा अशी घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून देखील योग्य त्या उपयोजना केल्या जात आहे. विशेष म्हणजे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी औरंगाबादच्या हर्सूल येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी टोल फ्री क्रमांकावर मदतीसाठी येणाऱ्या फोन कॉल प्रतिसाद देऊन आवश्यक ती माहिती दिली जाते. या टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर विविध कारणांसाठी दररोज सुमारे 100 ते 125 कॉल येतात. मात्र बुलढाणा येथे झालेल्या अपघातानंतर या ठिकाणी येणाऱ्या फोनवरून आता माहिती विचारण्याची पद्धत बदलली आहे.


यापूर्वी हर्सूल नियंत्रण कक्षात येणाऱ्या फोन कॉलवर वाहनचालक एंट्री-एक्झिट पॉईंट, अपघाताची तक्रार, प्राण्याचा अपघात यासह इतर समस्यांबद्दल विचारणा करत होते. मात्र आता महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वीच वाहनचालक टोल फ्री क्रमांकावर कॉल करू लागले आहेत. ज्यात महामार्गावरील सुविधा, पेट्रोल पंप आणि विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाण कोणते असेल याची माहिती विचारली जात असल्याची माहिती समृद्धी महामार्ग विभागीय अधिकारी आशिष फरांदे यांनी 'एबीपी माझा' शी बोलतांना दिली आहे. तर बुलढाणा येथे झालेल्या अपघातानंतर आतापर्यंत असे अंदाजे 40 ते 45 फोन कॉल आल्याचे देखील फरांदे  म्हणाले. 


अपघात टाळता येणार? 


समृद्धी महामार्गावर लांब पल्याचा प्रवास करतांना वाहनचालकांनी ब्रेक घेतला पाहिजे असे आवाहन अभ्यासक करत आहेत. मात्र अनेकदा प्रवासी याबाबत जागृत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने, डोळा लागल्याने अपघात होतांना पाहायला मिळत आहे. मात्र आता स्वतः प्रवाशीच हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विश्राती घेण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी सुरक्षित ठिकाणाबद्दल माहिती विचार असल्याने याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. तर यामुळे अपघात देखील टाळता येणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Buldhana News: धावत्या खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये तरुण मद्यपान करतानाचा व्हिडीओ व्हायरल, खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात