शिर्डी : मराठा आरक्षणा संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मांडलेली भुमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र नुसते अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. लोणी गावातील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने कोणती मदत दिली नसून हे केवळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका केली.
मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरल्याने केंद्राकडे बोट दाखवत असून स्वत:च अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ वाया घालवत आहेत. सरकारमधील मंत्री जी विधाने करतायत यावरून सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावेळी एकत्रितपणे सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे लागेल, असं मत भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय.
संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा हा त्यांचा प्रश्न, मात्र मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भुमिका उभी केली नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भुमिका घ्यावी असही राधाकृष्ण विखे पाटील यांनी संभाजीराजे यांच्या नवीन पक्ष काढणायच्या वक्तव्यावर स्पष्ट केलंय.
घोषणाबाज सरकार म्हणून राज्य सरकारचा लौकिक असून कोविडच्या काळात काम करताना अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले. यावर मंत्र्यांनी मदतीची अनेकदा घोषणा केली मात्र अद्याप कोणतीही मदत नाही. याउलट केंद्राने पाठपुरावा करून 5 लाखांची मदत दिली असून पत्रकारांना विमा कवच तसेच मृत पत्रकाराच्या कुटुंबाना देणार का? असा सवाल विखे यांनी विचारलाय. तर म्युकोरमायकोसीस बाधित रुग्णांचा उपचाराचा खर्च पाहता राज्य सरकारने योजनेतून दिलेली मदत अत्यल्प असून यात इंजेक्शनचा खर्च देखील भागणार नाही असं सांगत सरकारची फक्त वाऱ्यावर वरात सुरू असल्याचा टोला महाविकासआघाडी सरकारला लगावलाय.