शिर्डी : देशात गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही भर पडू लागली. पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पत्रकारांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलं. विविध संघटनासह सरकारने या सर्वांच्या कार्याचं कौतुक केलं. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना काळात काम करताना अनेक पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आणि काही जणांचा मृत्यू देखील झाला. यात पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही समावेश होता. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांनाही 50 लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्याची घोषणा केली होती. मात्र आजपर्यंत एकाही कुटुंबाला ही मदत मिळालेली नाही. परंतु केंद्र सरकारने मात्र तात्काळ पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देऊ केली हे विशेष.


रायकर कुटुंबीय कोपरगाव शहरात राहतं. पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनामुळे मृत्यू झाला आणि पत्नी आणि दोन लहान मुले उघड्यावर आली. अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आणि मदत केली खरी, मात्र राज्य सरकारने घोषणा करुन देखील अद्याप कोणतीही मदत दिली नसल्याचं त्यांच्या पत्नी शीतल रायकर यांनी सांगितलं. मात्र याच वेळी केंद्र सरकारची पाच लाखांची मदत मात्र तात्काळ मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकरने मदत द्यावी यासाठी राज्यपालांना पत्र पाठवलं. राज्यपालांनीहीनी सरकारला तात्काळ मदत देण्याचे निर्देश दिल्याची माहिती शीतल रायकर यांनी दिली.




30 मार्च 2021 रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत पत्र पाठवले असून लवकर घोषणा केलेली मदत देण्याबाबत सांगितलं आहे. मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात लक्ष घालणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 


पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन
कोरोनाकाळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं 2 सप्टेंबर 2020 रोजी पुण्यात कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. जम्बो कोविड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्ब्युलन्स वेळेत न मिळाल्याने पांडुरंग रायकर यांना प्राण गमवावे लागले. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.