मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने 606 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामं सुरळीत सुरु आहेत, मात्र महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी संभाजी राजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.
संभाजी राजे म्हणाले की, रायगड संवर्धनाची जी कामं सुरु आहेत. त्यापैकी दोन गोष्टींनी मला अस्वस्थ केलं आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 125 कोटी रुपये किल्ल्याच्या डागडुजीसाठी खर्च केले जाणार आहेत. तर 147 कोटी रुपये हे महाड ते रायगड किल्ल्यादरम्यानच्या रस्त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. तसेच इतर पैसे हे किल्ल्याच्या आसपासच्या 23 गावांमधील विकासकामांसाठी खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे.
संभाजीराजे म्हणाले की, महाड ते रायगड किल्यादरम्यानच्या रस्त्यासाठी 147 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला त्याचे कंत्राट दिले आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने मोबिलिटी चार्ज म्हणून 7.50 कोटी रुपये कंत्राटदाराला दिले आहेत. परंतु दोन वर्षात कंत्राटदाराने एक टक्का कामदेखील केलेलं नाही. कंत्राटदाराला आता अजून 8.50 कोटी रुपये मिळणार आहेत. मुळात सुरुवातीला घेतलेल्या साडेसात कोटी रुपयांचं काहीही काम केलेलं नाही. त्यात आता पुन्हा साडेआठ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या सर्व बाबींवरुन लक्षात येतंय की रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. याबाबतची माहिती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, रोपवेच्या कामातही मनमानी कारभार पाहायला मिळत आहे. पुरातत्व खातं आम्हाला सहकार्य करत आहे. मात्र रोपवेचे काम करणारे संबंधित लोक कोणत्याही परवानगीशिवाय रोपवेची क्षमता वाढवत आहेत. रोपवे आणि रस्त्याच्या कामाची बोंबाबोंब सुरु आहे, याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण संबंधित सर्वांना बोलावू, त्यांच्याशी चर्चा करु. भ्रष्टाचार होत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.