Sambhajirraje on Governor : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती  (Sambhaji Raje Chhatrapati) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj)  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. संभाजीराजे यांनी कडक शब्दात ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करतंय का असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांन आंदोलनाचा इशारा दिला आहे.


'...तर उठाव होणारच'


संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!' या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.




राज्यपालांचं छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य


औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 'शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनंही करण्यात आली. मात्र सरकारने याबाबत अद्याप काहीही केलं नसल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.


'पंतप्रधान आणि फडणवीसांनी उत्तर द्यावं'


राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं, त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आधीही केली होती.