Sambhaji Bhide News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी एका महिला पत्रकाराला आधी टिकली लाव, मग तुझ्याशी बोलतो असं बोलल्यानं वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर भिडे यांना महिला आयोगानं नोटीस देखील पाठवली होती. महिला पत्रकाराला उद्देशून ते वक्तव्य केल्यानंतर भिडे यांच्यावर टीका देखील होत होती. पण काही दिवसापूर्वी टिपू सुलतान जयंती साजरी करणे बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी भिडे यांनी पोलिसांकडे निवेदन सादर केले होते. यावेळी त्यांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला निवेदन दिले त्या महिला अधिकाऱ्याने देखील टिकली किंवा कुंकू लावले नव्हते. मात्र भिडे त्यांना आदरपूर्वक निवेदन देताना फोटोत दिसत आहेत.
त्यामुळे भिडे यांनी आपल्या त्या भूमिकेवरुन यू-टर्न घेतला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टिपू सुलतान जयंती साजरी करणे बंद करण्याच्या मागणीसाठी संभाजी भिडे यांनी काही दिवसापूर्वी पोलिसांकडे निवेदन सादर केले होते. यावेळी त्यांचा महिला पोलीस अधिकाऱ्याला निवेदन देतानाचा फोटो आता व्हायरल होत आहे. या महिला अधिकाऱ्यांशी आदराने भेट घेत त्यांनी आपलं निवेदन सादर केलं होतं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासोबतचा भिडे यांचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात दुबुले यांनी टिकली लावली नव्हती. मात्र तरी भिडे या महिला अधिकाऱ्यांना आदरपूर्वक निवेदन सादर करताना दिसत आहेत.
दरम्यान यावरुन काँग्रेसनं देखील भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराशी बोलणारे भिडे, टिकली न लावलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांना मात्र नम्रतेने निवेदन देतात, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वक्तव्यानंतर महिला आयोगाकडून संभाजी भिडेंना नोटीस
महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली होती. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर महिला आयोगानं संभाजी भिडेंना नोटीस देखील बजावली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना नोटीस देत म्हटलं आहे की, महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असं महिला आयोगानं म्हटलं होतं.