Sambhaji bhide contravention statement : संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यामुळे संभाजी भिडे वादात सापडले आहेत. त्यांना या वक्तव्यानंतर महिला आयोगानं नोटीस देखील बजावली असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 


महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी  दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.


महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना नोटीस देत म्हटलं आहे की, महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे.  याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असं महिला आयोगानं म्हटलं आहे. 






काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील भिडेंचा निषेध केला आहे. भिडे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करते. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रकार कदापी सहन न होणारे आहेत. सध्या माध्यमकर्मी आणि पत्रकारांना सातत्याने अपमानाला सामोरं जावं लागतं आहे, हे निषेधार्ह आहे, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.  


संभाजी भिडेंनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

संभाजी भिडेंनी थेट मंत्रालय गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं, ही मोठी घडामोड आहे. कारण युतीच्या काळात झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे सूत्रधार अशी प्रतिमा ज्यांची रंगवली गेली. त्या संभाजी भिडेंना देवेंद्र फडणवीसांनीच क्लीन चिट दिली. पण तितक्यात सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. तेव्हापासून संभाजी भिडे काँग्रेस-राष्ट्रवादीशी सत्ता असलेल्या सरकारपासून दूरच होते. हिंदुत्ववादी पक्षांशी संभाजी भिडेंचं कधीच वाकडं नव्हतं पण महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी भिडेंनी मंत्रालयात पाऊल ठेवलं नव्हतं.