Devendra Fadnavis : उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 


उर्जा उपकरण प्रकल्पही मविआ सरकारच्याच काळातच गेला: फडणवीस


उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्या संदर्भात नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे तीन पार्ट असतील, दोन पार्टची घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातुन गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारू नये. अधिकारी सुद्धा हताश होतात, कुठलीही माहिती न घेता जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या काळात गेले हे दाखवणे बंद केले पाहिजे.  


मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं...
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या आरोपांमुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांच्या टीकेला समोरे जावे लागत आहे. तर राज्यात विरोधी पक्षांकडून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.  कोणताही प्रकल्प एखाद्या राज्यात तीन-चार महिन्यात येतो आणि जातो, असं होत नाही. कुठलीही प्रक्रिया ही आधीपासून सुरु असते. प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही, की इकडून आला आणि तिकडे गेला, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील बाहेर गेलेल्या प्रकल्पांबद्दल दिले. 


जितेंद्र आव्हाडांवर काय म्हणाले फडणवीस...


फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन मारहाण केली म्हणून कारवाई झाली. आपण खूप मोठं केलं आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.


फडणवीस म्हणाले की, अफजलखान कबरीवरील अतिक्रमण हटविले आहे. आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असंही ते म्हणाले. गुजरात निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मला पक्षाने जबाबदारी दिली आहे. ती पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, मला गुजरातमध्ये प्रचार करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.


ही बातमी देखील वाचा


Eknath Shinde : जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, राजकीय हस्तक्षेप नाहीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे