(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2021 : मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहूत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान, प्रस्थानानंतर पालखी मंदिरात मुक्कामी
दरवर्षी शेकडो ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
देहू : यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadhi Wari 2021) कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (1 जुलै) प्रस्थान झाले. भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरुन एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान झाले आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रस्थान झाल्यानंतरही तुकाराम महाराजांच्या पादुका 1 ते 18 जुलैदरम्यान देहू येथील मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यातच राहतील. वारीतील सर्व नित्य उपक्रम येथेच केले जाणार आहे. त्यानंतर 19 जुलै रोजी एसटीने या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत
वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. देहूमध्ये आज होणाऱ्या तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला एकूण 350 जणांना परवानगी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30) हा आदेश देण्यात आला. या पूर्वी परवानगी दिलेल्या 100 भाविकांसह जादा 250 भाविकांना परवानगी सोहळ्याला हजर राहण्याची परवानगी देण्यात आला आहे.
या दहा पालख्यांना परवानगी
- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
- संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडनेपूर-अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
- संत चंगतेश्वर महाराज (सासवड)
तर आळंदी इथून उद्या (2 जुलै) प्रस्थान होणाऱ्या ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला पूर्वीच्या 100 वारकऱ्यांसह जादा 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.