शिर्डी : जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. साईबाबांच्या जन्मस्थानच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता याला शिर्डी ग्रामस्थ विरोध करताना दिसत आहेत. गावच्या विकासाला विरोध नाही, मात्र जन्मस्थानाला विरोध आहे. दरम्यान, विरोध तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागल्यानं आता सरकार काय भूमिका घेणार याकडं साईभक्तांच लक्ष लागलं आहे.


वर्षभरापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईंचं दर्शन घेतल्यावर आपल्या भाषणात साईंचा जन्म पाथरी या गावी झाल्याचं वक्तव्य केले होतं. त्याचवेळी साईंच्या जन्मस्थानचा मुद्दा निर्माण झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रपतींना निवेदन देऊन आपला विरोध दर्शविला होता. आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरी असा उल्लेख करीत निधी देण्याची घोषणा केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. एखाद्या गावच्या विकासाला निधी देणार असला तर हरकत नाही. मात्र, साईंचं जन्मस्थान म्हणून जर विकास होणार असेल तर त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी घेतली आहे.
दरम्यान खरंच साईंचा जन्म कुठे झाला आहे? साईबाबा कुठून आले? याबाबत अधिक जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला. साईबाबा आगमन ते समाधी शताब्दी यावर शिर्डी गेझेटिअर(अनटोल्ड स्टोरी )या पुस्तकाचे लेखक प्रमोद आहेर यांच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया घेतली. मात्र, त्यांनीही हा दावा फेटाळून लावत साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत अनेक ठिकाणचे दावे यापूर्वी झाले असल्याचं सांगितलं. जर वारंवार असा वाद निर्माण झाला तर साईंच्या सर्वधर्मसमभाव या संदेशाला हरताळ फासला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज -
साईबाबांचे जन्मस्थान पाथरी(जि. परभणी)हे असून राज्य सरकारने त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे शिर्डीतील साईभक्तांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले होते.

संबंधित बातम्या -

शिर्डी : साईंच्या जन्मस्थळ वादावर संस्थान अध्यक्ष, ग्रामस्थ राष्ट्रपतींच्या भेटीला