शिर्डी : ख्रिसमस सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी साईबाबांच्या झोळीत भरभरुन दान दिलं आहे. गेल्या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी जवळपास 16 कोटी 93 लाख रुपये साईचरणी अर्पण केले आहेत. याशिवाय सोने-चांदीचाही दानात समावेश आहे. यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा तीन कोटींनी दानात वाढ झाली असून देशात आर्थिक मंदी असताना साईंच्या झोळीत मात्र कोटींचे दान प्राप्त झालं आहे.
साईबाबांच्या समाधीचं 23 डिसेंबर ते दिनांक 2 जानेवारी 2020 या काळात सुमारे 8 लाख साईभक्तांनी दर्शन घेतलं. या अकरा दिवसात आलेल्या साईभक्तांनी सुमारे 16 कोटी 93 लाख रुपयांचे दान साईचरणी अर्पण केलं आहे. याशिवाय 1.2 किलो सोनं आणि 17 किलो चांदी साईबाबांना अर्पण केली आहे. मागील 2019 या वर्षात साईंच्या झोळीत 292 कोटी रुपये दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले असून दिवसेंदिवस साईंच्या दानात वाढ होत असून 2300 कोटींच्या ठेवी विविध बँकांत जमा असल्याची माहिती साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक येतात व आपल्या ऐपतीप्रमाणे दान करतात.
देशात आर्थिक मंदीची स्थिती असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात वाढ झाली आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या केलेल्या दानात अमेरिकन डॉलर, चीन, सिंगापूर, न्यूझीलंड, कुवेतमधील चलनाचा समावेश आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारेही 1 कोटी 38 लाखांचं दान आलं आहे.
साईचरणी आलेल्या दानाचं स्वरुप
दक्षिणा पेटी - 9 कोटी 54 लाख रुपये
देगणी कांऊटर - 3 कोटी 46 लाख रुपये
चेक, डीडी, मनी ऑर्डर - 1 कोटी 51 लाख रुपये
डेबिट/ क्रेडिट कार्ड - 1 कोटी 38 लाख रुपये
ऑनलाईन देणगी - 73 लाख रुपये
परकीय चलन - 24 लाख रुपये
सोने (1213 ग्रॅम) - 42 लाख रुपये
चांदी (17 किलो)- 24 लाख रुपये