मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनधींवर गंभीर आरोप केलेत. रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीचं मोठा अडथळा आहेत. कंत्राटदारांना कामाची टक्केवारी मागतात. अशा लोकप्रतिनीधीमुळं रस्त्यांच्या कामाचा दर्जा घसरलाय. रस्ते वेळेत पुर्ण होत नाहीत, अशी नाराजी गडकरी यांनी जाहीरपणे व्यक्त केली. गंभीर बाब अशी की औरंगाबादच्या बैठकीत गडकरींना कंत्राटदारांनी थेट काही लोकप्रतिनिधींची नावचं सांगितली.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर उस्मानाबाद जिल्ह्यातील 100 कोटींच्या एका रस्त्याचा विषय आला. कंत्राटदारांनं लोकप्रतिनिधी दोन टक्क्याप्रमाणं दोन कोटी मागत असल्याचा बैठकीत आरोप केला. नव्हे पैसे दिल्याशिवाय कामच सुरू करू देत नाही, असं गडकरींना सांगितलं. त्यावर गडकरींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नितिन गडकरींच्या कानपिचक्यांमुळं वातावरण तापलं आहे. पण या कार्यक्रमाच्या आठ दिवस आधीच भाजपाचे दोन लोकप्रतिनिधी रस्ते कामातल्या टक्केवारीवरुनंच एकमेकांशी भिडले होते.

भाजप आमदार-खासदारांमध्ये जुंपली -
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला. तर चिखलीकर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केलाय. नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामावरुन भाजपच्या बंब आणि चिखलीकर यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

आमदार बंब यांनी नांदेड जिल्ह्यातील पेनुर-शेवडी-सोनखेड या रस्त्याच्या कामाची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. दरम्यान संतापलेल्या चिखलीकर यांनी बंब हेच ब्लॅकमेलर आहेत, त्यांच्या पत्राची दखल घेऊ नका असं म्हटलंय. बंब तक्रार करुन ठेकेदारासोबत तडजोड करतात असा आरोप चिखलीकरांनी केला आहे.
आमदार बंब यांचे प्रत्युत्तर -
आपण काही राजन आणि दाऊत सारखा एरीया वाटून घेतला नाही. जेणेकरुन आपापले जिल्हे सांभाळून लूट करावी, असे म्हणत चिखलीकरांच्या आरोपाला आमदार प्रशांत बंब यांनी प्रत्युत्तर दिलंय, बंब हे ब्लॅकमेलर असल्याचं सांगत खासदार चिखलीकरांनी प्रधान सचिवांना आमदार बंब यांच्या तक्रारीकडे लक्ष न देण्याचं लेखी सांगितले होतं. तर, बंब यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष घालावे आणि लोकप्रतिनिधींनी संकेत पाळण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान अवाढव्य आणि अवास्तव लूट होत असताना चिखलीकर तिकडे लक्ष देऊ नका म्हणतात म्हणजेच काहीतरी आहे, असे म्हणत आपण आपल्या तक्रारींवर पुराव्यासह ठाम असल्याचे सांगत चिखलीकरांना आपल्या मतदार संघात भ्रष्टाचार उघड करण्याचे देखील चॅलेंज बंब यांनी केलं आहे. दरम्यान, गडकरींच्या नक्की काहीतरी लक्षात आले असेल म्हणून ते बोलले. मात्र, मराठवाड्यातील काँट्रॅक्टर आणि अधिकारी हे काही नेत्यांना हाताशी धरुन अशा गोष्टी करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

Contract | मराठवाड्यात ठेकेदारांना घरी बोलावण्याची प्रथा; खासदार जलीलांचा आरोप | ABP Majah