सांगली : जवानांच्या प्रश्नांवरुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले. खोत आणि पडळकर यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांसोबत खोत आणि पडळकर यांची शाब्दिक बाचाबाची झाली.


देशसेवा करुन निवृत्त झालेल्या आणि सेवेत कार्यरत असणाऱ्या वाळवा तालुक्यातील साखराळे येथील चार कुटुंबातील सैनिकांनी 26 जानेवारीपासून इस्लामपूरच्या प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या सैनिकांना गावठाणमधून महाराष्ट्र शासनाकडून प्लॉट मंजूर झाले होते. ते इस्लामपूर प्रांताधीकारी यांनी रद्द केले. हे प्लॉट परत मिळावेत यासाठी या सैनिकांनी त्यांच्या कुटुंबासह इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. साखराळे गावातील गावठाण जागेतील जवानांना मंजूर झालेले प्लॉट राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने प्रांताधिकाऱ्यांनी रद्द केले असा आरोप करत जवान आपल्या कुटुंबासह आंदोलनाला बसले आहेत.


जय जवान, जय किसान अशी आपण घोषणा देतो, पण आपण काम कुणाचे करतोय. या माजी सैनिकांना त्यची जागा का दिली जात नाही, अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत. हे सैनिकांचे प्लॉट जवानांच्या कुटुंबाकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना द्यायचे आहेत का असा थेट प्रांताधिकारी याना सवाल करत पडळकर यांनी इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले.


दरम्यान सैनिकांना आपल्या हक्काच्या जागेसाठी उपोषणाला बसावे लागते हे दुर्दैवी असल्याचे म्हणत विधानपरिषदेच्या दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका केली.


दुसरीकडे जवान त्याच्या कुटुंबासह इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर प्लॉट परत मिळवण्यासाठी बसले आहेत. सचिन पवार, गणेश मोकरे, सुभाष शिंदे, महेश उथळे या चार सैनिकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला आमदारांनी पाठबळ दिल्याने हा प्रश्न लवकर सुटेल, अशी आशा सैनिकाना वाटते.