पालघर : बनावट नोटांची छपाई करुन या नोटांची मुंबई शहरात विक्री करणाऱ्या एका टोळीचा घाटकोपर युनिट गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या युनिटच्या अधिकार्यांनी मुंबईतील विक्रोळी आणि पालघरच्या वाडा परिसरात कारवाई करुन चार आरोपींना अटक केली. अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारुख रसुल चौधरी अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या 35 लाख 54 हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या टोळीचे सदस्य पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील राहत्या घरी बनावट नोटांचा छापखाना चालवत होते.
अटकेनंतर या चौघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना बुधवार 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटांचे काही विदेशी देशविघातक शक्तींकडून बनावटीकरण करुन, या बनावट नोटा चलनात आणून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न काही टोळ्यांकडून होत आहेत, मुंबई शहरात अशा काही टोळ्या बनावट नोटांची विक्री करीत आहेत अशी माहिती मिळताच वरिष्ठांनी सर्वच गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश देऊन या टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते, या आदेशानंतर पोलिसांनी अशा आरोपींचा शोध सुरु केला होता.
पोलिसांची शोधमोहीम सुरु असतानाच काहीजण बनावट नोटांची विक्रीसाठी विक्रोळी परिसरात येणार आहेत, अशी माहिती घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीनधनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्तूद, महेंद्र दोरकर, आनंद बागडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिपीन सावंत, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार अरुण सावंत, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक सुभाष मोरे, शशिकांत कांबळे, गिरीश जोशी, मुरलीधर सपकाळे, नागनाथ जाधव, पोलीस शिपाई धर्मराज ताजणे, लुकमान सय्यद, दिपक खरे, महेश सावंत, दिनेश शिंगोटे, चालक पोलीस नाईक संतोष धुमाळ, राजाराम कदम यांनी विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्ग, प्रविण हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे दोन तरुण आले, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच अब्दुल्ला खान आणि महेंद्र खंडास्कर या दोघांना पोलिसांनी घेराव लावून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 2 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. या दोघांविरुद्ध विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असता त्यांनी त्यांचे इतर दोन सहकारी आहेत. त्यांनीच त्यांच्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील राहत्या घरी या बनावट नोटांची छपाई केल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने तिथे जाऊन अमीन शेख आणि फारुख चौधरी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा तसेच बनावट नोटांच्या छपाईसाठी लागणारे प्रिंटर, स्कॅनर, पेपर, इंक बॉटल आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही कारवाईत पोलिसांनी चारही आरोपींकडून सहा लाख वीस हजार रुपयांच्या दोनशेच्या 310 नोटा, एकवीस लाख आठ हजार पाचशे रुपयांच्या पाचशेच्या 4 हजार 217 नोटा, चार लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयांच्या दोनशेच्या 2 हजार 276 नोटा आणि तीन लाख सत्तर हजार शंभर रुपयांच्या शंभरच्या 3703 बनावट नोटा जप्त केल्या. या चौघांच्या चौकशीत त्यांचे इतर दोन सहकार्यांची नावे समोर आली आहे, मात्र या चौघांच्या अटकेनंतर ते दोघेही पळून गेले आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बुधवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री करुन भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत किती बनावट नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री केली आहे याचा आता पोलीस तपास करीत आहेत.