Saamana Editorial On BJP: सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) भाजपवर (BJP) निशाणा साधण्यात आला आहे. अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याच्या आरोपांखील अटक करण्यात आली होती. सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. याचप्रकरणाचा दाखला देत सामना अग्रलेखातून भाजपवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील, ट्रम्प यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होतील.  सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री करावी, असं म्हणत सामनातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. 


सामना अग्रलेखात म्हटलंय की, "देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्या विरोधात न घाबरता कारवाई करा,' अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. कोणत्याही भ्रष्टाचाऱयाला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआयचा पोपट पिंजऱ्यातच मालक सांगेल त्याप्रमाणे सीबीआयचा पोपट 'विटू विटू' किंवा 'मिठू मिठू' करीत आहे."


"ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा मोदींच्या ढवळ्या-पवळ्याप्रमाणेच काम करत आहेत. जोपर्यंत भाजपकडे भ्रष्टाचार धुऊन काढण्याची वॉशिंग मशीन आहे तोपर्यंत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार मोडून काढू वगैरे भाषा न वापरलेलीच बरी.", असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे. 


सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, "कारवाया आणि अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल."


काय म्हटलंय सामना अग्रलेखात सविस्तर जाणून घेऊयात... 


पंतप्रधान श्री. मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे.


कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल.


पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे सीबीआयला भ्रष्टाचाऱयांवर कारवाई करण्यासंदर्भात खुली सूट दिली आहे. सीबीआयच्या स्थापनेदिवशी पंतप्रधान मोदी यांनी सीबीआयला सांगितले, 'ताकदवान भ्रष्टाचाऱ्यांवर न भिता कारवाई करा.' पंतप्रधानांचे भाषण गांभीर्याने घ्यायचे की टाळ्या वाजवून सोडून द्यायचे? असा प्रश्न त्या सोहळ्यातील उपस्थितांना पडला असेल. 'देशात आता भ्रष्टाचाराविरोधात कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. भ्रष्ट व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी तिच्या विरोधात न घाबरता कारवाई करा,' अशा सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. कोणत्याही भ्रष्टाचाऱयाला वाचवू नका आणि पाठीशीही घालू नका, असे मोदी म्हणत असले तरी सीबीआय म्हणजे मोदी-शहांच्या पिंजऱयातला पोपट आहे याबाबत कुणाच्याही मनात शंका नसावी. एकेकाळी सीबीआय म्हणजे 'काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली व सीबीआयचा पोपट पिंजऱयातच मालक सांगेल त्याप्रमाणे 'विटू विटू' किंवा 'मिठू मिठू' करीत आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणा आज मोदींच्या ढवळय़ा-पवळय़ाप्रमाणेच काम करीत आहेत. मोदी म्हणतात, 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका.' याचा अर्थ (असा की) जे भाजपात आहेत असे भ्रष्टाचारी किंवा ज्यांनी भाजपात प्रवेश करून गंगास्नान केले असे सोडून बाकी सगळे भ्रष्टाचारी आहेत व सीबीआय-ईडीने त्यांना सोडू नये. मोदी म्हणतात, 'सीबीआयने काळ्या पैसेवाल्यांवर कारवाई केली.' मग मेहुल चोक्सी, नीरव मोदींवर कारवाई का केली नाही? ते काय पांढऱया दुधाने स्नान करीत आहेत. अदानी महाशयांनी 'शेल' म्हणजे खोका पंपन्यांच्या माध्यमातून 42,000 कोटींचे


काळे धन आपल्या कंपन्यांत


आणले. सीबीआयने त्यावर काय कारवाई केली? शिवसेनेतून 'फुटलेले' 5 खासदार व 9 आमदार असे आहेत की ते सीबीआय आणि ईडीच्या हिटलिस्टवर होते. आता त्यांनी शिवसेना सोडताच सीबीआय, ईडीने त्यांना भाजप वॉशिंग मशीनमध्ये टाकून एकदम पांढरेशुभ्र करून घेतले. जोपर्यंत भाजपकडे भ्रष्टाचार धुऊन काढण्याची वॉशिंग मशीन आहे तोपर्यंत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार मोडून काढू वगैरे भाषा न वापरलेलीच बरी. त्यात त्यांचेच हसे होत आहे. सीबीआयच्या संमेलनात मोदी म्हणाले, 'भ्रष्टाचार हा घातक आहे. गरीबांचा हक्क मारण्याचे काम भ्रष्टाचार करतो.' मोदी बरोबर बोलत आहेत, पण स्टेट बँक, एलआयसी वगैरेंच्या पैशांची लूट अदानी यांनी केली व हा पैसा गरीब जनतेचाच होता. गरीबांचा पैसा लुटल्याबद्दल सीबीआयने तुमच्या अदानीवर काय कारवाई केली? अदानी हे अत्यंत शक्तिमान उद्योगपती आहेत. त्यामुळे सीबीआय त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार नाही. पुन्हा अदानी-मोदी हे बंधुतुल्य नात्याने बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती वगैरे शब्द वापरून मोदींनी भ्रम निर्माण करू नये. भ्रष्टाचार हा सत्ताधाऱयांचा असो नाहीतर विरोधकांचा, दोन्ही प्रकारचा गैरव्यवहार संपवायला हवा. 'लोकशाहीत आणि न्यायाच्या रस्त्यात भ्रष्टाचार हा सगळय़ात मोठा अडथळा आहे. सीबीआयला हा अडथळा दूर करायचा आहे. 2014 च्या आधी मोठमोठे घोटाळे झाले, पण गुन्हेगार घाबरले नाहीत. कारण यंत्रणा त्यांच्या खिशात होती.' असे मोदी म्हणतात. मोदी यांची रेकॉर्ड आजही 2014 च्याआधीच फिरत आहे. 2014 नंतरच्या घोटाळय़ांवर ते बोलायला तयार नाहीत. 'राफेल'पासून अनेक घोटाळे मोदींच्या डोळय़ांसमोर घडले. विरोधकांच्या मागे 'पेगॅसस' लावले व त्यासाठी


जनतेच्या तिजोरीतले शेकडो कोटी


खर्च केले. आता अदानीचा घोटाळा समोर आला. महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी 2000 कोटी रुपये खर्च झाले. ते आणले कोठून? सीबीआय याचा तपास करणार आहे काय? लोकशाही व न्यायाच्या रस्त्यात भ्रष्टाचार हा अडथळा आहे याचा अनुभव सध्या शिवसेना घेत आहे. राज्यपालांच्या घटनाबाहय़ कृत्यांना न्यायालयाने संरक्षण दिले. राज्यातील सरकार पाडण्यास हातभार लावला. निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव व धनुष्यबाणाचा सौदा करून न्याय विकला, तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म? असे आज मोदींना विचारावेसे वाटते. पंतप्रधान श्री. मोदी यांचे सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने केलेले भाषण भ्रष्टाचार मोडून काढणारे नसून यंत्रणांच्या मनमानीस उत्तेजन देणारे आहे. भाजप तुमच्या पाठीशी आहे, आमच्या विरोधकांना सोडू नका, असा संदेश देणारे आहे. सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा मागील सात-आठ वर्षांत साफ धुळीस मिळाली आहे व त्या यंत्रणांना स्वच्छ करणारे वॉशिंग मशीन अद्यापि निर्माण व्हायचे आहे. मोदी यांच्या भाषणांमुळे अदानी वगैरे भाजप मंडळींचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. कारवाया व अटका टाळण्यासाठी भ्रष्टाचारी मंडळी भाजपात प्रवेश करतात याचे मोदींना कौतुक वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. मि. ट्रम्पही दिल्लीत येऊन भाजपात प्रवेश करतील व त्यांचे 'सूटबूट' भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जातील. सीबीआय, ईडीने फक्त कपडे वाळत घालून त्यास कडक इस्त्री वगैरे करण्याचे काम करावे. मोदींना नेमके हेच सांगायचे होते. संदेश स्पष्ट आहे. भ्रष्टाचारी फक्त भाजपातच राहतील व त्यांना अभय मिळेल.