5th April Headlines: आज दिवसभरात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. दख्खनचा राजा जोतिबाची आज यात्रा आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असून साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. मविआकडून ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन होणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील घडामोडी...


दिल्ली 


- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यासाठी दोन दिवस राहिलेले असताना आज सुद्धा संसदेत गोंधळाची शक्यता आहे. कामकाजाच्या राहिलेल्या दिवसांसाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.


- 14 विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेत विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थाचा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी वापरला जात असल्याच म्हंटलं आहे.


- राउज एवेन्यू कोर्टात आज मनीष सिसोदियांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी मनीष सिसोदिया अटकेत आहेत.


कोल्हापूर 


- दख्खनचा राजा जोतिबाची आज यात्रा आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्यदिवस असून साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मानाच्या सासनकाठ्या जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्यात. यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा अशी मोठी तयारी केली आहे. 


ठाणे 


-  शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचा आज पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको मोर्चा. ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुपारी शिवाजी मैदान येथून मोर्चा निघणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत.


मुंबई 


- राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊस तोडणी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा तसेच प्रलंबित अनुदान देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेतर्फे आज आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.


- ईडी तपास करत असलेल्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय आपला निकाल जाहीर करणार आहे.


- राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीने समन्स पाठवले आहे. चंद्रकांत गायकवाड यांना बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. सोमवारी ईडीने गायकवाड निवासस्थानावर छापा टाकला आणि सर्च ऑपरेशनही केले


-  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालय येथे होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही पहिलीच मंत्रीमंडळ बैठक आहे. त्यामुळे महत्वाचे निर्णय होऊ शकतात.


अमरावती 


- हनुमान जन्मोत्सव हा अमरावतीत खूप मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. एकीकडे खासदार नवनीत राणा यांचं सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार तर दुसरीकडे काँग्रेसने हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्व संध्येला भव्य मिरवणूक आयोजित केली आहे. हनुमान जन्मोत्सव मिरवणूकीत पाच ढोल पथक, उज्जैन महाकाल येथील प्रसिध्द झांच पथक, बाभूळगाव येथील संदल, पाच डिजे, पाच वारकरी दिंडी, पाच ढोल पथक आणि हरियाणा वरून हनुमानजी यांचे आकर्षण अवतार असे असून राजकमल चौक येथे हनुमंत रायाची आरती करून मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसाचे पठण केले जाणार आहे.


पुणे 


- आरटीई प्रवेश प्रक्रियेत अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रवेशाची ऑनलाईन सोडत आज निघणार आहे. 


 नाशिक 


-  नाशिक शहरात महत्वपूर्ण बैठक. पाणीकपात संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे.


 अहमदनगर 


- श्री काळभैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने यात्रेनिमित्त आज पारनेर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस 1,11,000 रुपये, द्वितीय बक्षिस 71,000, तृतीय बक्षिस 51,000, चतुर्थ बक्षीस 31,000 रुपये असणार आहे.


- शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विविध प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. 


यवतमाळ


- भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे नेते शंकर अण्णा धोंडगे पाटील यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. जिल्ह्यातील तेलंगणा सीमेलगत असलेले पांढरकवडा, घाटंजी, झरीजामनि या भागात बीआरएसचा प्रभाव वाढत आहे.