शिर्डी : टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवाविण्यात यावं, असं आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केले आहे.


वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे.


संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे. अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडीओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभा करत आहे.


टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बेंगलोर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात याबाबत निदान होईल अशी अपेक्षा असून टोमॅटो रोगाचा मानवी रोगाशी संबंध जोडणे चुकीच असल्याच मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलं.


टोमॅटोच्या फळाला नवीनच विषाणुची बाधा झाली आहे. त्यामुळे त्याचा रंग, आकार बदलत असून यात टोमॅटोला खड्डा पडून आतमध्ये फळ काळे पडून सडू लागते. टोमॅटोवर पिवळे चट्टे पडतात यामुळे टोमॅटो शेती धोक्यात आली आहे. या नवीनच विषाणुजन्य रोगामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत .


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर भागात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातील टोमॅटोवर विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समोर आली आहे संगमनेर अकोले तालुक्यात निळवंडे धरण ते आश्वीपर्यंतच्या प्रवरा नदीकाठावरील दोन्ही बाजुच्या गावात या रोगाचा टोमॅटोवर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.एकट्या नगर जिल्ह्यात अकोले व संगमनेर तालुक्यात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रावरील टोमॅटोला या तरंगा रोगाची बाधा ही झालेली आहे.


Tomato Infection | नव्या रोगामुळे 5 हजार एकरावरील टोमॅटो सडले, टोमॅटोचा विषाणूजन्य रोग हिरावतोय बळीराजाच्या तोंडचा घास