बीड : नको त्या वयामध्ये प्रेम करायचं आणि त्यानंतर पळून जाऊन लग्न करणाऱ्यांच्या अनेक प्रेम कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक कहाणी बीडमध्ये घडलीय. अल्पवयीन मुलीवर प्रेम केले तिच्याशी पळून जाऊन विवाह केला यामुळे पोलीस स्टेशनची हवा खाणारा प्रेमवीर लग्नावर ठाम होता आणि अखेर पोलिस कस्टडी मधल्या या प्रेमवीरांचे लग्न लावून देत पोलिसांनीच शासकीय गाडीतून विदाई केली.
एखाद्या चित्रपटाला शोभावे असे कथानक घडले आहे. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये. या प्रेम कहाणीची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली होते. पण प्रेम कहाणीमध्ये क्लायमॅक्स आला तो डिसेंबर 2017 ला. गावातील भावकी मधल्या दोघांच्या नाजूक प्रेमाची चर्चा गावात सुरु होण्याआधीच या प्रेमवीराने गावातून धूम ठोकली आणि थेट पुणे गाठले. त्यावेळी ही मुलगी अल्पवयीन होती. कुटुंबापासून गावापासून दूर झालेले हे प्रेमवीर पुण्यात राहू लागले. मुलगा कंपनीत नोकरी करू लागला. 2018 या मुलीने एका मुलाला ही जन्म दिला.
अल्पवयीन मुलीला पळवून नेले म्हणून पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अल्पवयीन मुलगी असल्यामुळे कायद्याचा रेटा वाढला. अपहरणाचा गुन्हा नोंद असल्याने पोलिसांनी तपास करून अल्पवयीन असल्याने या मुलावर अपहरणाचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी फेब्रुवारी 2019 मध्ये या दोघांना शोधून आणले. खरतर या प्रेमवीरांना ही त्यांच्या प्रेमाची शिक्षा होती पण हे दोघेही लग्न करण्यावर ठाम होते.
भावकी मधल्याच मुलावर प्रेम करणारी ही मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने मुलावर अत्याचारासह पोस्को कलम लागले. त्यामुळे त्याला कोठडीत तर मुलीला शासकीय सुधारगृहात पाठविले. मुलगी त्याच्यासोबतच लग्नावर ठाम होती. परंतु अल्पवयीन असल्याने तिच्या म्हणण्याला अर्थ नव्हता. या काळात कोर्ट कचेऱ्या, पोलिस चौकशी या सगळ्या कारवाईला सामोरे जाताना हे प्रेमवीर मात्र लग्नावर ठाम होते. अखेर ती मुलगी सज्ञान झाल्यानंतर न्यायालयाने तिचे म्हणणे ऐकले आणि दोघांच्या लग्नाचा निवाडा झाला.
अखेर लग्नाची तारीख ठरली. सामाजिक न्याय भवनात या दोघांचा विवाह ठरला. एरव्ही कौटुंबिक नातेवाईकांच्या गराड्यात लग्न होते. मात्र या लग्नाला सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, महिला व बालविकास अधिकारी आर. डी. कुलकर्णी मुलीचे मामा झाले. तर, समाजकल्याण अधिकारी राजू एडके व वित्त व लेखा अधिकारी शिवप्रसाद जटाळे मुलाचे मामा झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे भंते बनले आणि वऱ्हाडी म्हणून तत्त्वशील कांबळे व अशोक तांगडे. फिजिकल डिस्टन्स पाळून हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर अगदी फुलांनी सजवलेल्या गाडीतून या नवदांपत्य त्यांनी पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली