अमरावती : पुणे येथे मेळघाट मधील एका महिलेनी एप्रिल महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. महिलेची प्रसूती तातडीने खासगी रुग्णालयात करावी लागली. मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवावे लागले. रुग्णालयाचं 14 दिवसाच बिल झालं अडीच लाख रुपये. या महिलेचा पती मजुरीसाठी पुणे येथे राहतो. मग इतकी मोठी रक्कम आणायची कुठून आणि रुग्णालयातुन सुट्टी कशी होणार ही चिंता त्यांना होती, मग शेवटी अशावेळी अमरावती जिल्हा परिषदेने अडीच लाख रुपये भरले आणि यांची रुग्णालयातुन सुट्टी झाली. आता या जुळ्या मुलांसमवेत हे दाम्पत्य लवकरच अमरावती जिल्ह्यात येणार आहे.


अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील पिंपळखुटा येथील दयाराम दहिकर हा तरुण पुण्यात कामानिमित्त पत्नी अनितासह भाड्याने मागील 5 वर्षांपासून राहत आहे. कोरोनामुळे सर्व कामकाज बंद पडले. वाहतूकही बंद आहे. त्यामुळे दयाराम यांना त्यांच्या गर्भवती पत्नीला घेऊन मूळ गावी अमरावती जिल्ह्यात परत नेणे अशक्य होते. त्यामुळे हे दाम्पत्य पुण्यातच अडकले. यातच 18 एप्रिलच्या मध्यरात्री पत्नी अनिता हिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे दयाराम आपल्या पत्नीला घेऊन एका शासकीय रुग्णालयात गेले. मात्र, त्याठिकाणी महिलेला दाखल करून घेतले नाही. त्यामुळे दयाराम यांच्यासमोरील समस्यांमध्ये आणखी वाढ झाली.


 Maharashtra Lockdown 4.0 | महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, राज्य सरकारचा निर्णय


पत्नीच्या वेदना पाहून दयाराम यांनाही काही सुचत नव्हते. त्यानंतर दयाराम यांनी पुण्यातच एका खासगी रुग्णालयात पत्नीला आणले. या ठिकाणी 60 हजार रुपये डिपॉझिट भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. खासगी कंपनीत आठ ते दहा हजार रुपये महिन्याने काम करणाऱ्या दयाराम यांना ही रक्कम भरणे अशक्य होते. दयाराम यांनी शेजारी राहणाऱ्या मित्रांकडून पैशाची जुळवाजुळव करून पुण्याच्या चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दरम्यान त्यानंतर काही वेळातच अनिता त्यांची प्रसूती झाली. त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु, दोन्ही मुलांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याने त्यांना अन्य एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे या दोन्ही चिमुकल्यांना वाचवण्यासाठी दयाराम यांनी दुसऱ्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले.


लॉकडाऊन-4 चं स्वरुप कसं असणार, किती वाढणार? सर्व मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांना सूचना


अमरावती जिल्हा परिषदेची मदत


जुळ्या मुलांवरील खासगी रुग्णालयात येणाऱ्या खर्चाची कल्पना असल्याने दयाराम यांनी पैशाची जुळवाजुळव सुरू केली. यावेळी त्यांनी मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांना घराची परिस्थिती सांगितली आणि मदत करण्याची विनंती केली. दुसरीकडे चिमुकल्यावर खासगी रुग्णालयात दर दिवशी पंधरा हजार रुपये याप्रमाणे 14 दिवसाचे बिल अडीच लाख रुपये इतके काढण्यात आले. बिलाची ही रक्कम भरणे दयाराम यांना अशक्य होते. त्यामुळे पुन्हा त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांना संपर्क केला आणि तोटे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे त्यांच्याशी संवाद साधून त्याला कशी मदत मिळेल याचा पाठपुरावा केला. अखेर या प्रकरणावर तत्काळ तोडगा काढत जिल्हा परिषदेने हेल्थ मिशन अंतर्गत अडीच लाख रुपयांची मदत करून खासगी रूग्णालयाच्या संपूर्ण बिलाचा भरणा केला.


अमरावती जिल्हा परिषदेने घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने चिमुकल्यांना जीवदान मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर "जन्म दिला आईने, अन् जीवनदान दिले जिल्हा परिषदेने" हीच मन इथं खरी ठरली.


Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद