अहमदनगर : शनी शिंगणापुरात आस्था विरुद्ध कायदा अशी स्थिती निर्माण झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनी चौथऱ्यावर दर्शनाचा चंग बांधलेल्या भूमाता ब्रिगेडला गावकऱ्यांनी रोखलं आहे. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं आहे.

 

चौथऱ्यावरील महिला प्रवेशबंदी ही शेकडो वर्षापासून आहे. ती अबाधित राहावी, असा दावा शनी मंदिर बचाव कृती समितीने केला आहे.

 

दुसरीकडे भक्तीचा अधिकार हा कायद्याने मान्य केला असून शनी मंदिर चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणाऱ्यांना कायद्यानं धडा शिकवावा, अशी तंबी हायकोर्टाने राज्य सरकारला दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही आज महिलांची अडवणूक करण्यात आली.

 

 

--------------------------------


शनीशिंगणापूर: भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई महिला कार्यकर्त्यांना शनीच्या चौथऱ्यावर जाण्यास  अवघ्या गावानं आणि पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. दोनदा शनी चौथऱ्यावर जाणाऱ्या तृप्ती देसाई यांना प्रंचड धक्काबुक्की करुन मंदिर परिसराच्या बाहेर करण्यात आलं

 

भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्तांना रोखल्यानंतर तृप्ती देसाई यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. "जोवर आम्हाला दर्शन मिळणार नाही तोवर आम्ही इथून बाजूला हटणार नाही. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही अशाप्रकारे रोखणं हे चुकीचे आहे. गावकऱ्यांसोबतच आम्हाला पोलीस आणि मंदिर प्रशासनानं रोखलं. कोर्टानं आदेश देऊनही राज्य सरकारनं याची अंमलबजावणी केलेली नाही. गृहमंत्री फडणवीस काय करीत आहेत? जर त्यांना दोन खाती संभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. जर आज आम्हाला दर्शन मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्री फडणवीसांविरोधातही FIR दाखल करु" असा आक्रमक पवित्रा तृप्ती देसाई यांनी घेतला.

 

कालच उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार धार्मिक स्थळांवर स्त्री-पुरूष भेद करता येणार नाही, असे निर्देश देण्य़ात आले आहेत. मात्र, कोर्टाच्या निर्देशाची प्रत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही महिलेला चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, असा पवित्रा मंदिर समितीसह गावकऱ्यांनी घेतला आहे.

 

------------------------------

 

-कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेले असतानाही आम्हाला रोखलं जातयं, गृहमंत्री काय करतायेत? जर आम्हाला दर्शन मिळालं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात FIR दाखल करु: तृप्ती देसाई

 

- तृप्ती देसाईंचा शनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न, गावकऱ्यांनी देसाईंना रोखलं, तणावाचं वातावरण

 

- भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या आणि तृप्ती देसाई शनी चौथऱ्याजवळ पोहचल्या

 

- शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशाचा महिलांचा प्रयत्न, मा. आमदार भानुदास मुरकुटेही आंदोलनात सहभागी

 

------------------------------

 

शनिशिंगणापूर: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भूमाता महिला ब्रिगेड आज शनीशिंगणापुरात शनी चौथऱ्यावर प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याही असणार आहेत. पुण्याहून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आपल्या कार्यकर्त्यांसह शनीशिंगणापुरकडे रवानाही झाल्या आहेत.

 

प्रथेनं बंद केलेलं दार कोर्टानं जरी उघडलं असलं तरी प्रत्यक्षात आज शिंगणापुरात काय घडतं? हे ही महत्वाचं आहे. कारण, आम्ही चौथऱ्यावर चढून शनी दर्शन करु, असा चंग भूमाता ब्रिगेडनं बांधला आहे. तर चौथऱ्यावर महिलांनाच नाही तर पुरुषांनाही बंदी आहे.  त्याऐवजी महिलांनी शनीचं दर्शन घ्यावं, असा दावा अद्यापही स्थानिक करत आहेत.

 

दुसरीकडे कोर्टाच्या निकालाची प्रत अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे केवळ कोर्टाच्या निकालानं हा प्रश्न निकाली निघाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

राईट टू वर्शिप अर्थात भक्तीचा अधिकार हा कायद्यानं मान्य केला. शनी मंदिर चौथऱ्यावर किंवा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारणाऱ्यांना कायद्यानं धडा शिकवावा अशी तंबी हायकोर्टानं राज्य सरकारला दिली.