अजित देशमुख यांच्याच शब्दात..
मित्रांनो, जरा वाचा, ही कागदं देशाच्या कामी आली आहेत. यांनी मला साथ दिली, आम्ही तसूभरही इमानदारी सोडली नाही. कोरोनामुळं पहिल्यांदा लॉकडाऊन झालं, त्या पहिल्या बारा दिवसात मी हाताळलेल्या कोट्यावधींच्या घोटाळ्याच्या फाईल हाताखालून काढल्या.
महत्वाचे कागद ठेवून आता लागत नसलेली कागदं घराबाहेर काढली. या कागदांनी हजारो कोटी रुपये वाचवले, अनेकांच्या झोपा उडवल्या, अनेक घोटाळे बहाद्दर उघडे पाडले. ही माझी मेहनत होती. लॉकडाऊन नसतं तर मला यासाठी वेळ मिळालाच नसता. तसं पाहिलं तर ही कागदं बाहेर काढताना मलाही कसतरी वाटतं होतं, पण पर्याय नव्हता.
या कागदांनी मला समाजसेवा शिकवली, समाजपुढं ताठ मानेनं उभं केलं, अनेकांची जिरवली, त्यांना मी कसा विसरेन. मी आयुष्यातील सर्व मेहनतीतील तब्बल अर्धी मेहनत आणि इमानदारीने कमवलेल्या पैशांतील जवळपास अर्धा पैसा यातच घातला.
सीडी डॉन या एका मोटार सायकलवर मी साडेचौदा वर्ष, हजारो किलोमीटर फिरलो. किक मारून पाय दुखायला लागला म्हणून ती विकावी लागली. पत्र्याच्या घरात या कागदांचं वैभव मी ठेवलं होतं. कधी कधी घरावरचे पत्रे उडून ही कागदं भिजतील, अशीही भीती वाटायची. पण दैवी शक्तीवर माझा विश्वास आहे. तरलं सगळं.
याचं कागदांमुळं महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते माझ्या कामवर प्रेम करू लागली. माझ्याकडून काही तरी शिकायला, नवीन ऐकायला मिळतंय म्हणून माझ्या संपर्कात राहू लागली. विशेषतः ज्या अधिकाऱ्यांना मी सुरुवातीला खटकत होतो, ते माझं काम पाहून माझे हितचिंतक झाले. आज त्यांची संख्या कमी नाही. पण मी कुठली शिफारस केली नाही, अन् कुठले काम सांगितले नाही. त्यामुळेच आमची मैत्री चिरकाल टिकून आहे, रहाते.
"तू मेहनत कर, नियम बदलतील, सरकारला बदल करावे लागतील, त्यामुळं थकून चालणार नाही" असं हीच कागदं मला शिकवून गेली. देश सेवेत कामाला आलेल्या आणि माझ्यात जिद्द निर्माण करणाऱ्या या कागदांना मी कधीच विसरू शकणार नाही. निर्जीव कागदं समाजकारणात कामाला आली. या कागदांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. समाज मनाच्या हुंदक्यांना साथ दिली. गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविले. काही कागद काळे झाले, म्हणून तर भ्रष्टाचाराचे काळे कारनामे बाहेर आले. त्यामुळे लोकांवर जरब निर्माण झाली.
बोगस स्वातंत्र्य सैनिक, बोगस पिक विमा, रेल्वेचं पाचशे कोटी रुपयांचे बोगस भु संपादन, गैर हजर कर्मचाऱ्यांचे पंचनामे, कॉपी मुक्त परीक्षा, पुण्यातील प्राधिकरणाचे प्रकरण, साखर कारखान्यांना वाटावे लागलेले साडेतीनशे कोटी, कार्यकर्त्यांची शेकडो शिबिरे, माहिती अधिकाराने वठणीवर आणलेले पाचशे अधिकारी, लोक जागृती, लोक शिक्षण, अशा अनेक क्षेत्रात या कागदांनी सहभाग नोंदवला.
करोडोंचा निवडणूक खर्च घोटाळा, त्यात एकाच वेळी दोषी आढळलेले जिल्ह्यातील सर्व महसूल खात्याचे अधिकारी, पाण्याचे टँकर, चारा छावण्या, पुरवठा विभागातील घोटाळा, मजूर संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अडचणीतल्या बँका आणि पतसंस्था, विद्यापीठ परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी स्थापन झालेल्या समित्या, पथकांचा फिरण्यासाठीचा कमी झालेला खर्च असे अनेक विक्रम या कागदांनीच केले.
परळीच्या थर्मल मधील दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बँकेत खाते उघडणे, त्यांच्या खात्यात मजुरीचे पैसे भरणे, जीपीएफ खात्यात जमा करणे, असे करता करता राज्यातील थर्मलमध्ये अनेक बदल या कागदांनी घडवले. हजारो तरुणांनी यातून आदर्श घेत, आपापल्या भागातील प्रश्न सोडविले. अनेकांना या कागदांकडे पाहून लढण्याचे बळ मिळाले. अनेक लेखमाला, प्रश्नोत्तरे, निवेदने, मागण्या, सरकार बरोबर केलेला पत्र व्यवहार, मागण्या मार्गी लागलेली पत्र, असे अनेक देश सेवेची कामे यातून घडली.
जनतेच्या प्रश्नांची दखल घेत त्यांना न्याय मिळवून देताना मला या कागदांनी समाधान दिले. मागे वळून पाहतांना आणि ही कागदं पाहतांना मी अक्षरशः गहिवरून गेलो होतो. पण म्हणतात ना, "जो आला, तो जाणार" त्याप्रमाणे ही कागदपत्र मी तरी किती वर्षे सांभाळणार? शेवटी त्यांनाही जावं लागलं.
मी या सर्वातून आपणास एकच सांगू इच्छितो की, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रत्येकानं देश आपला आहे, आपणही त्याचे देणे लागतो, ही भावना मनात ठेवून काही तरी चांगलं जनहिताच काम करायला हवे. तरुणांनी आपापल्या गावात भ्रष्टाचार थांबवून विकास करण्यासाठी पाऊल उचलायला हवं. स्वच्छ मनानं काळी केलेली कागदं परिवर्तन घडवून आणू शकतात. पण ती काळी करताना स्वार्थ नसला तरच चांगल्या मार्गाला लागता येतं.
तर मग तरुणांनो, करा आपापल्या गावात एक टीम, राजकारण विरहित समाज सेवा करणारी. केवळ जनहिताची कामं हाताळणारी. पूर्ण वेळ नाही, आपापले कामधंदे करून मिळेल तेवढा वेळ देणारी. कोणाशी ना दुष्मनी - ना दोस्ती. आणि पहा कसं घडतंय गावात परिवर्तन, होतात विकास कामं. तरुणांनो, देश बदलण्यासाठी अशीच कागदं तुम्ही काळी करा. माझ्यासारखा अनुभव घ्या. नाही तर जिवनात येऊन का उपयोग. मी एकट्याने पाच-सात हजार कोटी वाचवले. तुम्ही गावातले दोन-पाच कोटी वाचवून पहा, जनता कशी डोक्यावर घेते तुम्हाला.
UPSC Success Story | यूपीएससीतील यशवंत, बीडच्या मंदार पत्कीच्या यशाचं गमक काय?