सोलापूर : प्रहार संघटनेच्या नेतृत्वात सोलापूर परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. 16 महिन्यांच्या थकीत पगारासाठी कामगारांनी काल रात्रीपासून कामबंद आंदोलन केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात सामान्यांसाठी परिवहन सेवा बंद असली तरी अत्यावश्यक सेवेसाठी परिवहन सेवेचा वापर करण्यात आला आहे. मोबाईल क्लिनिक, क्वॉरंनटाईन करण्यात येणाऱ्या लोकांना क्वॉरंनटाईन सेंटरला ने-आण करण्यासाठी, अत्यावश्यक सेवेततील कर्मचाऱ्यांच्या वापरसाठी देखील परिवहन सेवेचे वापर करण्यात आला आहे. असे असले तरी या काळातील पगार देखील पालिकेतर्फे देण्यात आला नाहीये.
जुलै 2017, ऑक्टोबर 2017 ते जून 2018 या दहा महिन्यातील जवळपास 5 कोटी 29 लाख रुपये कर्मचाऱ्यांचे वेतन देखील देणे बाकी आहे. मात्र, यावर वाद सुरु असल्याने प्रकरण सर्वोच्च न्यायलयात न्यायप्रविष्ठ आहे. तर फेब्रुवारी 2020 ते जुलै 2020 या सहा महिन्यातील 3 कोटी 15 लाख रुपयांच्या वेतन परिवहन कर्मचाऱ्यांचे थकीत आहेत. प्रहार संघटनेच्यावतीने काल रात्रीपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. न्यायप्रविष्ठ असलेले थकीत वेतन सोडून मागील सहा महिन्यांपैकी किमान तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी केली.
कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
या आंदोलनात परिवहन कर्मचाऱ्यांनी माझासमोर आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. परिवहन विभागात चालक असलेले आर. के. म्हेत्रे यांना उच्च रक्तदाब आहे, हृदयाची शस्त्रक्रिया देखील झाली आहे. 50 वर्षांवर वय असताना देखील म्हेत्रे हे मागील चार महिन्यांपासून दररोज कामावर येतात. अत्यावश्यक सेवा म्हणून सेवा बजावल्यानंतर देखील कोणताही परतावा परिवहन विभागातर्फे अद्याप मिळालेला नाहीये.
गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी उद्यापासून एसटी धावणार
थकीत वेतनामुळे मुलगा गमावला
तर चालक असलेल्या अन्नप्पा शावंती यांनी सांगितलेली माहिती ऐकून धक्काच बसेल. थकीत पगारासंदर्भात मागील काही महिन्यांपूर्वी देखील प्रहारने आंदोलन केले होते. तर मागच्या वर्षी कोणत्या तरी वर्तमानपत्रात परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबात तोडगा निघाला असून वेतन झाल्याची बातमी प्रकाशित झाली. त्यानंतर मुलगा किरण शावंती याने आपल्या वडिलांकडे पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र, वडील अन्नप्पा शावंती यांनी पगार झाले नसल्याचे सांगितल्यांतर तुम्ही खोटे बोलत आहात असे म्हणत किरण यांने गळफास लावून आत्महत्या केली. परिवहन विभागात काम केल्यानंतर थकीत वेतनामुळे आपला 18 वर्षाच्या मुलगा गमावलेले अन्नप्पा यांना बोलताना अश्रू अनावर झाले.
पालिकेकडून प्रयत्न सुरू
दरम्यान या परिवहन कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पालिकेच्या वतीने देखील प्रयत्न सुरु आहेत. पालिकेचे अपर आयुक्त विजय खोरोटे यांनी परिवहन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात वरीष्ठांशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहि ती अपर आयुक्तांनी यावेळी दिली. त्यामुळे या परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाची सेवा सुरू