मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर काल लागला. या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर घोषित करण्यात आला आहे.

19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवी हा पेपर एक लाख 54 हजार 596 उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार 105 उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून 16 हजार 592 उमेदवार पात्र झाले आहेत.

तक्रार असल्यास 15 ऑगस्टपर्यंत नोंदवा
टीईटी परीक्षेच्या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास तक्रारीची सुविधा देण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत लॉग इन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

TET Exam | टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत घोळ; चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळावे, विद्यार्थांची मागणी

 परीक्षेत झाल्या होत्या गंभीर चुका 

राज्यात आज जवळपास 3 लाख 43 हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली होती. पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती. दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका देखील होत्या. त्यामुळे विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली होती. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली होती.

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI