नवी दिल्ली : देशात उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड अशा पाच राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या पाचही राज्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून महाराष्ट्रातही आज एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन शेअर केलेेल्या दोन फोटोंमुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.   


यावेळी रोहित पवार यांनी आधी खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्वीटवरील एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, रोहित पवार, अमोल कोल्हे आणि भाजप नेते तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे उपस्थित होते. दरम्यान या फोटोमध्ये राष्ट्रवादी नेत्यांसोबत भाजपचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. तर दुसऱ्या फोटोमध्येही असंच काहीसं दिसून येत आहे. रोहित यांनी त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत दिसत आहेत. दरम्यान या दोन फोटोंमुळे आगामी निवडणूकीत काही वेगळी राजकीय समीकरणं दिसतील का अशी चर्चा होत असली तरी या दोन्ही भेटी कामानिमित्त असल्याचंही हे फोटो शेअर करताना सांगण्यात आलं आहे.


भेटीचं कारण काय?


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतानाचा फोटो शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये राणे यांच्या केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयासंबंधी ही भेट असून कर्जत जामखेडमध्ये बारा बलुतेदार आणि हस्त कारागीर यांच्यासाठी योजनेसंदर्भात ही भेट घेतल्याचं पवारांनी नमूद केलं आहे. तर दानवे सोबतच्या फोटोबाबत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेराज्यमंत्री दानवेंशी चर्चेंसंबधी ही भेट असल्याचं समोर येत आहे.



इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha