मुंबई : भीमा कोरेगाव ( Bhima koregaon) प्रकरणाची चौकशी करणा-या आयोगासमोर शरद पवार (Shatad Pawar) हजेरी लावणार आहेत. आयोगानं नुकत्याच जारी केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहतील. त्याच पार्श्वभूमीवर 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचं कामकाज पुण्याऐवजी मुंबईत होणार आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी चौकशी आयोगाचं कामकाज हे सुरूच आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या आयोगानं चौकशीसाठी बोलावणं पाठवलं आहे. यापूर्वी मुंबईत होणा-या सुनावणी सत्रादरम्यान 4 एप्रिलला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव ते या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते. शरद पवारांची साक्ष घेण्याची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. या घटनेनंतर शरद पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं या अर्जात म्हटलं होतं.
आपल्या विधानात पवारांनी म्हटलं होतं की, भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराआधी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे. त्यामुळे शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगानं नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची चौकशी सध्या चौकशी सुरू आहे. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्यातील कोरेगाव-भीमा इथं झालेल्या घटनेनं राज्यभरात दंगल उसळली होती. या दंगलीबाबत स्थानिक रहिवासी अनीता सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य काहीजणांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फौजदारी फिर्याद नोंदविली गेली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात देशात 71 हजार 365 कोरोना रुग्णांची नोंद, 1217 जणांचा मृत्यू
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- Hijab Controversy : आक्रमक जमावाला सामोरं जाणारी 'ती' युवती कोण? काय आहे कर्नाटक हिजाब प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha