Rohit Pawar : दावोसमध्ये 98 टक्के गुंतवणूकीचे करार परदेशी कंपन्यांशी केल्याची सरकारी वक्तव्ये बघून आश्चर्य वाटत नाही, कारण सरकारला रेटून खोटं बोलायची सवयच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. आता तर ही सवय अधिक Pro version मध्ये Develop झालेली दिसत असल्याचे पवार म्हणाले. दावोस दौऱ्याच्या मुद्यावरुन रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
61 MOU पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच
61 MOU पैकी 45 MOU भारतातील कंपन्यांशीच झाले आहेत. या कंपन्यांनी 11,02040 कोटीचे करार म्हणजेच 74 टक्के गुतंवणूक आपल्या देशातील कंपन्यांनीच केली असल्याचे रोहित पवार म्हणाले. याहून विशेष म्हणजे देशातील कंपन्यांनी केलेल्या 45 MOU पैकी 36 MOU महाराष्ट्रातल्या कंपन्यानीच केली आहे. म्हणजे जवळपास 10,13642 कोटीची म्हणजेच 67 टक्के गुंतवणुकीचे करार हे राज्यातीलच असल्याचे रोहित पवार म्हणाले. यामध्ये काही कंपन्या तर नरीमन पॉईंट भागातच आहेत. एका कंपनीने तर 3.05 लाख कोटीचा MOU व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला. म्हणजे कंपनीचे प्रतिनिधी इकडे मुंबईत, मुख्यमंत्री तिकडे दावोसला असा मुंबई-दावोस दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सने करार केला गेल्याचे रोहित पवार म्हणाले.
खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते ?
सरकार दावोसला जाऊन अपयशी ठरले असे नाही, परंतु खोटे आकडे फुगवून सांगण्याची गरज का पडते? हा प्रश्न पडत असल्याचे रोहित पवार म्हणाले. देशातील आणि महाराष्ट्रातील कंपन्यांशीच करार केले जात असतील तर मग दावोस जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच Magnetic Maharashtra सारख्या कार्यक्रमावर भर द्यायला हरकत नसावी असे रोहित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. महाराष्ट्रासाठी गुंतवणूकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे चाळीस टक्क्यांपर्यंत असते. पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्याबाबतीत सुमारे 65 टक्के असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या: