Nanded: नांदेड जिल्हयातील माहूर येथे भगर आणि शेंगदाण्याची आमटी  खाल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली . या सर्व भाविकांवर माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून चार रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. भगर खाल्याने विषबाधा होण्याचा हा पहिलाच प्रकार नसून उपवासाला भगर विषबाधेलाच निमंत्रण देत असल्याचे समोर आल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. माहुरच्या यात्रेत भगर खाऊन 50 हुन अधिक भाविकांना भगर खाल्याने विषबाधा झाल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ आहे. (Nanded News)


नक्की काय झाले?


माहुर येथे ठाकूर बुवा यांची यात्रा सुरु आहे. या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात . हिंगोली जिल्ह्यातील जवळा येथील दिंडी यात्रेसाठी आली होती . काल एकादशी  असल्याने रात्री या दिंडीतील भाविकांनी भगर आणि  शेंगदाण्याची आमटी खाली. पहाटे त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. आता सर्व रुग्णाची प्रकृती बरी असून सायंकाळ पर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.


भगरीमुळे विषबाधा होण्याचे कारण काय?


राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून भगरीने होणाऱ्या विषबाधेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना या घटना अजून थांबलेल्या नाहीत. कोंदट वातावरणाने भगरीला बुरशी लागण्यास मदत होते. त्यामुळे भगरीच्या साठवणूकीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकादशी किंवा उपवासाला भगरीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. पण भगरीत अस्परजिलस प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे फ्युमिगाक्लेविनसारखी विषद्रव्ये त्यात तयार होतात. आर्द्रतेमुळे भगरीला बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. बुरशी लागलेली भगर खाल्याने विषबाधा होण्याचा मोठा धोका असतो.


काय काळजी घ्यावी?



  • भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. सलग उपवास असलेल्या दिवशी या पदार्थांचे सेवन केल्याने ॲसिडिटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ, पोटाचे त्रास वाढतात. त्यामुळे हे पदार्थ पचनशक्तीच्या मर्यादेनेच खावेत असा सल्ला तज्ञ देतात.

  • भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी,व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवून ठेवू नका, जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका.


हेही वाचा:


मोठी बातमी: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यात आजाराची लागण, सोलापूरला जाऊन जीव सोडला