भंडारा: जिल्ह्यातील साकोली तालुक्यातंर्गत येणाऱ्या सानगडी गावातील भारतीय स्टेट बँकच्या शाखेत 21 डिसेंबरच्या रात्री दरोडा घालण्यात आला आहे. यामध्ये बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले 31 लाख 91 हजार 888 रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामध्ये रोकड आणि सोन्याचा समावेश आहे.


दुसऱ्या दिवशी बँक उगडल्यानंतर चोरीची घटना घडल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांनी देण्यात आली. सानगडी गावातील भारतीय स्टेट बँकच्या शाखेच्या मागच्या भागात असलेली खिडकी गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्यानेच लॉकरला छिद्र पाडल्यानंतर हाताला येईल तितका ऐवज चोरट्यांनी लुटला. मात्र लॉकरच्या खालच्या बाजूला ठेवण्यात आलेलं सोनं चोरट्यांच्या हाताला लागलं नाही. तसेच जवळपास साडे तीन लाख रुपयेही शिल्लक राहिले आहेत.


सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर चोरला
या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद होत असल्याने चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या कॅमेराचा डीव्हीआर चोरुन नेला. त्यामुळे या चोरीमध्ये समावेश असणाऱ्या आरोपींनी शोधणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. यामध्ये नेमकं किती सोनं चोरीला गेलं आहे याचा अंदाज अजून आला नाही.


मागील 25 वर्षापासून सुरक्षा रक्षक नाही
चोरी झालेल्या या बँकेत गेली 25 वर्षे सुरक्षा रक्षक नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ही बँक या परिसरातील मुख्य बॅंक असल्याचं सांगण्यात येतंय. लाखोंची उलाढाल होणाऱ्या बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच साफसफाईसाठी या बँकेच्या मुख्य दरवाज्याची चावी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दिली जात असल्याची माहिती पुढं आली आहे. या चोरीचा तपास लावण्याचं मुख्य आव्हान पोलिसांसमोर आहे.


या चोरीचा तपास लवकरच लावण्यात येईल आणि एका आठवड्याच्या आत चोर गजाआड असतील असं पोलिसांनी सांगितलं.